लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड : राधानगरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील एकोणीस ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. धामोड परिसरातील बुरंबाळी ग्रुपग्रामपंचायतीचीही निवडणूक होत असून, ही ग्रामपंचायत सलग दुसऱ्यांदा बिनविरोध करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत . सुकाणू कमिटीतील सर्व गटांचे सदस्य यासाठी प्रयत्न करीत असून, चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत.
बुरंबाळी व देऊळवाडी या दोन गावांसाठी ही ग्रामपंचायत असून, तीन प्रभागांतून सात सदस्य निवडण्यात येणार आहेत. गेल्या पंचवार्षिकमध्येही या ग्रामपंचायतीची निवडणूक याच सुकाणू समितीने बिनविरोध करून तुळशी परिसरात एक पायंडा घालून दिला होता. तोच कित्ता पुन्हा रंगविण्याच्या उद्देशाने सुकाणू समितीने गावातील सर्व गट व तरुणांना एकत्र करून चर्चेच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. प्राथमिक यात सकारात्मक प्रतिसाद असून, अंतिम चर्चा आज, गुरुवारी सायंकाळी होणार आहे व त्यावरच ही निवडणूक बिनविरोध होणार की लढणार हे ठरणार आहे.
ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठीच्या सुकाणू समितीमध्ये सर्वानुमते सरपंच अनिल आर्डेकर, पोलीस पाटील के. डी. इंगवले, माजी सरपंच एकनाथ चौगले, विलास बोडके, बी. एम. कांबळे, बाळू पाटील, शिवाजी जांभळे, भैया मोमीन या प्रमुखांसह अन्य सदस्य ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठीच्या प्रयत्न आहेत. पण, आज होणाऱ्या अंतिम चर्चेवर ही निवडणूक बिनविरोध होणार की लढणार हे ठरणार आहे.