कोल्हापूर : इंजेक्शनच्या सुईला घाबरणाऱ्यांना कोल्हापूरच्या संशोधकाने दिलासा दिला आहे. अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठात गेली पाच वर्षे संशोधन करणाऱ्या हुपरीच्या रोहन सुरेश इंग्रोळे या युवा संशोधकाने ही लस शोधली आहे.
जागतिक पातळीवर अशाप्रकारचे हे संशोधन पहिलेच असून डेंटल प्लॉसच्या आधारे उंदरांवर केलेल्या या यशस्वी प्रयोगाने मानवी लसीकरणात क्रांती झाली आहे. २२ जुलै रोजीच्या अमेरिकेतील ‘नेचर बायोमेडिकल इंजिनिअरिंग’ या प्रतिष्ठेच्या नियतकालिकाने हे संशोधन प्रकाशित करून त्यातील कल्पकता आणि भविष्यातील लसीकरण तंत्रज्ञानावर होणाऱ्या प्रभावाची दखल घेतली आहे.
हुपरी येथील डॉ. रोहन इंग्रोळे पाच वर्षे अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठात संशोधन करत आहेत. त्यांनी ही लसीकरणाची नवीन सुईविरहित पद्धत विकसित केली आहे. उत्तर कॅरोलिना स्टेट विद्यापीठाचे नॅनोमेडिसिन तज्ज्ञ डॉ. हरविंदर गिल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी निर्जंतुक केलेल्या विषाणूजन्य लेप दिलेल्या दाताच्या प्लॉसद्वारे उंदरांचे दात स्वच्छ केले. हार्वर्ड विद्यापीठाचे प्रा. विल्यम गियाननोबिल यांनी या संशोधनाचे कौतुक करताना पुढील मोठ्या क्लिनिकल चाचण्यांची गरजही नमूद केली आहे.
उंदरांवर यशस्वी प्रयोग
सुईचा वापर न करता लसीकरण करताना तोंडावाटे ड्रॉप्स किंवा नाकावाटे स्प्रे देता देते, परंतु इंजेक्शनची साठवणूक आणि वितरण व्यवस्था मोठ्या प्रमाणात आव्हानात्मक असल्याने डॉ. रोहन यांनी प्रथम हा प्रयोग उंदरांवर केला. त्यांनी प्लॉसवर प्रोटीन, निष्क्रिय व्हायरस, mRNA आणि लसीकरणासाठी आवश्यक नॅनोपार्टिकल्स कोट करून ते उंदरांच्या हिरड्यांमध्ये वापरले. या उंदरांमध्ये फुप्फुस, नाक, प्लीहा व हाडांमध्येही प्रतिकारक पेशी आढळल्या. याचा प्रभाव दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ राहिला आणि अन्न व पाण्याच्या सेवनावर त्याचा परिणाम झाला नाही. जेव्हा काही उंदरांना खतरनाक फ्लू व्हायरस दिला, तेव्हा लस घेतलेले उंदीर वाचले, तर न घेतलेले उंदीर मृत्युमुखी पडले.भविष्यातील शक्यतामानवांवरही छोट्या स्वरूपात प्रयोग केला. २७ स्वयंसेवकांच्या हिरड्यांमध्ये प्लॉससारख्या डेंटल पिकने रंगीत डाई पोहोचवली, ती ६० टक्के हिरड्यांच्या खोल भागात पोहोचली.
जगभर अनेक ठिकाणी सुई आणि शीतगृहांची साखळी नसल्यामुळे लसीकरणात अडथळे येतात. कमीत कमी प्रशिक्षणासह दूरस्थ भागांतील आरोग्यसेवा आणि जागतिक लसीकरणासाठी ही प्लॉस पद्धत फार उपयुक्त ठरू शकते. -डॉ. रोहन इंग्रोळे, युवा संशोधक, टेक्सास स्टेट विद्यापीठ.