‘जातपडताळणी’बाबत आज निकाल अपेक्षित
By Admin | Updated: May 9, 2016 00:46 IST2016-05-09T00:43:29+5:302016-05-09T00:46:12+5:30
प्रचंड उत्सुकता : महापौरांसह पाचजणांची घालमेल

‘जातपडताळणी’बाबत आज निकाल अपेक्षित
कोल्हापूर : महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह पाच नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने या पाचही जणांची घालमेल वाढली आहे; तर रविवारी जातपडताळणी कार्यालयास सुटी असतानाही या पाचजणांच्या निकालाबाबत शहरवासीयांतून प्रचंड उत्सुकता दिसून आली; पण याबाबतचा निर्णय आज, सोमवारी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
महापौर अश्विनी रामाणे, दीपा मगदूम, हसिना फरास, सचिन पाटील, किरण शिराळे अशा पाच नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्याच्या पडताळणीबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. आतापर्यंत महिला बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम, संतोष गायकवाड, डॉ. संदीप नेजदार व नीलेश देसाई या नगरसेवकांचे जातीचे दाखले अवैध ठरल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. त्यामुळे या उर्वरित पाचजणांचे काय होणार याबाबत रविवारीही समाजकल्याण विभागास सुटी असली तरीही महापालिका वर्तुळात प्रचंड उत्सुकता दिसून आली. पाचही नगरसेवकांबाबत काय झाले, याबाबत संपूर्ण चर्चा असूनत्याबाबत संबंधित पाचही नगरसेवकांची तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांचीही घालमेल वाढली आहे. रविवारीही काही नगरसेवकांनीसमाजकल्याण कार्यालयाचे उंबरे झिजविण्याचा प्रकार केल्याचे समजते. या पाचही नगरसेवकांबाबत आज, सोमवारी निर्णय अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)