कोल्हापूर : कोविडच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका स्मशानभूमीस शेणी दान करण्याच्या आवाहनाला शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महानगरपालिकेच्या पंचगंगा, बापट कॅम्प, कसबा बावडा तसेच कदमवाडी येथील स्मशानभूमीत महापालिकेच्या वतीने मृतदेहांवर मोफत अंत्यविधी करण्यात येतो. सध्या कोविडचा प्रार्दुभाव वाढल्यामुळे बाधितांची मृत्यूसंख्या वाढत आहे. मृतदेहांवर कराव्या लागणाऱ्या अंत्यविधीसाठी शेणी व लाकूड भविष्यात कमी पडू नये म्हणून स्मशानभूमीस शेणी दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनास प्रतिसाद देऊन श्री गुरुदेव दत्त वारकरी वाङ्मय सेवा मंडळाच्या वतीने ११ हजार शेणी स्मशानभूमीसाठी दिल्या. या शेणी उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी स्वीकारल्या. यावेळी इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, आरोग्य निरीक्षक महेश भोसले, दिंडी मंडळाचे प्रमुख महेश पेडणेकर, शैलेंद्र जरग, संतोष गोसावी, संदीप स्वामी, अबेर गायकवाड, प्रथमेश लगारे आदी उपस्थित होते.
-आझाद चौक प्ले कॉर्नरतर्फे तीन हजार शेणी
येथील आझाद चौक प्ले कॉर्नरतर्फे तीन हजार शेणी स्मशानभूमीसाठी दिल्या. यावेळी इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, आरोग्य निरीक्षक महेश भोसले, बिपीन लटोरे, विजयकुमार माने, महादेव पोवार, युवराज साळोखे, मुकुंद शिंदे, नितीन भिवटे, मोहन संकपाळ, धनाजी संकपाळ व प्रीतम लटोरे उपस्थित होते.
शहरातील सर्व सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, तालीम मंडळे, दानशूर व्यक्ती व नागरिकांनी मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी महानगरपालिकेच्या स्मशानभूमीस शेणी दान करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांनी केले आहे.
फोटो क्रमांक - १००५२०२१-कोल-केएमसी
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस श्री गुरुदेव दत्त वारकरी वाङ्मय सेवा मंडळाच्या वतीने ११ हजार शेणी देण्यात आल्या.