संकल्प नवरात्रीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:10 AM2017-09-21T01:10:02+5:302017-09-21T01:10:39+5:30

 Respected Navratri! | संकल्प नवरात्रीचे!

संकल्प नवरात्रीचे!

Next

आजपासून नवरात्रीचा उत्सव सुरू होतोय. घटस्थापनेने हा सण सुरू होतो. विजयादशमीला रावणदहन अर्थात कुप्रवृत्तींचे दहन करण्याचा संकल्प करीत आणि सोने लुटत त्याची सांगता होते. यालाच सीमोल्लंघन म्हणतात. स्त्रीशक्तीचा जागर, क्षात्र तेजाची उपासना करण्याचा सण. या नऊ दिवसांत घरोघरी धार्मिक श्रद्धेने भारलेले वातावरण असते. काहीजण हे नऊ दिवस उपवास करतात. काहीजण केवळ तीर्थप्राशनावर असतात, तर काहीजण केवळ फळे खातात. कुणी नवरात्रीचा पहिला आणि शेवटचा दिवस उपवास करतात. पन्हाळा तालुक्यात काही ठिकाणी केवळ रात्री जेवण घेतात, तेही दोडक्याची भाजी आणि भाताचे. तसे पाहता या नवरात्रीची तयारी पितृपक्षातच सुरू झालेली असते. सारवाण, धुणी काढणे, असे त्याला ग्रामीण भागात म्हणतात. घरांची स्वच्छता, अंथरूण- पांघरूणासह सर्व कपडे धुणे म्हणजेच हे सारवाण होय. नवरात्री सुरू होण्याआधी हे सर्व पूर्ण झालेले असते. श्रद्धेचा भाग बाजूला ठेवला तरी यानिमित्ताने घरांची स्वच्छता होऊन घरात कसे प्रसन्न, चकचकीत वाटत असते. नाहीतर नेहमीच्या कामाच्या धबाडग्यात कोण एवढी स्वच्छता करायला जातयं, असा सवाल मनात आल्यावाचून राहत नाही. वेगवेगळ्या भागात, प्रांतात हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. गुजरातमध्ये गरबा आणि दांडिया नृत्य हे या सणाचे वैशिष्ट्य असते. अलीकडच्या काही वर्षांत आपल्याकडेही दांडिया आणि गरबा नृत्याचे प्रस्थ वाढू लागले आहे. देवीच्या उपासनेचा एक भाग म्हणून भक्तिरसपूर्ण गाण्याच्या तालावर गरबा आणि दांडिया खेळला जात असला, तरी आता तोही एक ‘इव्हेंट’ बनला आहे. चित्रपटातील उडत्या चालीच्या गाण्यांनीही यामध्ये आता स्थान मिळविले आहे. या नवरात्रीचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे, या सणाच्या निमित्ताने केली जाणारी खरेदी. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे विजयादशमी. या दिवशी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह कपडे आणि किमती वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. खरिपाची पिके काढणीला आलेली असतात. काही निघालेली असतात. त्यामुळे शेतकरी वर्गही या खरेदीत मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला दिसतो. स्त्रिया तर या नवरात्रीत नऊ रंगांच्या साड्या परिधान करताना दिसतात. कोणत्या दिवशी, कोणत्या रंगाची साडी नेसायची हे ठरलेले असते. त्यादृष्टीने तयारी करून स्त्रीशक्ती आपला आनंद साजरा करीत असते. खरे तर नवरात्र हा स्त्रीशक्तीचा जागर असतो; पण स्त्रीचा खरोखरच आपण सन्मान करतो का? तिच्या कर्तृत्वाला पुरेसा वाव देतो का? आजही मुलगी जन्माला आली की तिच्याकडे ‘नकुशी’ म्हणू का पाहिले जाते? यांसारख्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून नवरात्रीच्या नऊ रंगांप्रमाणे नऊ संकल्प करायला हवेत. स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्याचा, मुलगी झाल्यानंतर मुलगा झाल्याइतकाच आनंद साजरा करण्याचा, मुलीकडे दायित्व म्हणून न पाहता ती आपल्या धनाची पेटी आहे असे समजण्याचा, तिला भरपूर शिकवून स्वावलंबी बनविण्याचा, महिलांना दुय्यम न समजण्याचा, महिलांवर अश्लील किंवा हेटाळणीयुक्त विनोद न करण्याचा, तिच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करण्याचा, विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी यांसारख्या गुन्ह्यांना कठोर शासन दिले जाऊन अशा नराधमांना कायमची अद्दल घडेल असे कायदे करण्याचा, स्त्री-पुरुष समानता केवळ बोलण्यापुरती न ठेवता ती कृतीत आणण्याचा, असे हे संकल्प असतील. केवळ स्त्रीयांनीच नव्हे, तर सर्वांनीच असे संकल्प केल्यास खºया अर्थांने स्त्रीशक्तीचा जागर केल्याचे पुण्य आपल्याला लाभेल. धार्मिक परंपरेचा आणि आपल्या संस्कृतीचे पालन करतानाच कालानुरूप त्यामध्ये बदल करण्याची मानसिकता आपण ठेवायला हवी. दसरा हा रावणावरील विजयाचे किंवा देवी आदिशक्तीने महिषासूर या राक्षसाचे केलेल्या पारिपत्याचे प्रतीक म्हणजे आसुरी शक्तीवरील, दुष्ट शक्तीवरील सत्प्रवृत्तीचा विजय म्हणून साजरा केला जातो. तसा तो करतानाच स्त्रीशक्तीला तिचे स्थान, मान आणि सन्मान देण्याचा संकल्प केला आणि तो अंमलात आणला, तर तेच खºया अर्थाने सीमोल्लघंन ठरेल.
- चंद्रकांत कित्तुरे

Web Title:  Respected Navratri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.