आजरा : आजरा तालुक्यातील जनतेवर राज्यशासनाकडून वारंवार अन्याय होत आहे. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राऐवजी गोवा राज्यात पाठवा. त्यामुळे विकासाबरोबर रोजगार व पर्यटनाला वाव मिळेल अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी पंतप्रधान,राष्ट्रपती, महाराष्ट्र व गोवा राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली व तहसिलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले.आजरा तालुक्यात धरणे झाली लाभ गडहिंग्लज व कर्नाटकाला झाला. जमिनी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गेल्या. आजऱ्याचे गडहिंग्लजचे प्रांत कार्यालय उत्तूरला द्या अशी मागणी असताना गारगोटीला हलविले. आजऱ्यातील काजू बोंडांवर फेणी उद्योग सुरू करण्याची गेल्या ४० वर्षांच्या मागणीला केराची टोपली दाखविली आहे. तालुक्यात रामतीर्थ, चाळोबा यासारख्या पर्यटन स्थळांचा आजही विकास झालेला नाही. त्यामुळे पर्यटनाला संधी मिळत नाही. आजऱ्यात घनसाळ तांदूळ, नाचणा, मिरची यासह पिकल्या जाणाऱ्या कृषी मालाला योग्य भाव मिळत नाही. तालुक्याला दोन मंत्री व एक मुख्यमंत्र्यांचे आमदार असताना तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी एकही मोठा उद्योग उभा राहिलेला नाही. त्यामुळे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात युवक गोवा राज्यात जात आहेत.पोल्ट्री व्यवसायातून तयार होणाऱ्या कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात गोवा राज्यात मागणी आहे. काजूची बोंडे मोठ्या प्रमाणात विक्री केली जातात. गोवा राज्यात मराठी भाषिकांची संख्या १५ ते २० टक्के आहे.आजऱ्यातील कृषी मालाला पणजी बंदरामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळू शकेल या सर्व मागण्यांचा विचार करता महाराष्ट्राला जय महाराष्ट्र करून आम्हाला गोवा राज्यात समाविष्ट करून घ्या अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर तानाजी देसाई,प्रकाश कोंडूसकर, राजू होलम, जी. एम. पाटील, निवृत्ती कांबळे, सखाराम केसरकर, संजय तरडेकर, शिवाजी गुरव यासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.जि.प.मतदारसंघ नको पण गोव्यात जाण्यास परवानगी द्यातालुक्यातील जनतेवर राज्य शासनाकडून आजपर्यंत अन्याय झाला आहे. आता जि. प. मतदार संघ कमी करून विकासकामाला खो घातला आहे. त्यामुळे जि.प.मतदार संघ नको पण गोवा राज्यात जाण्याची परवानगी द्या अशी मागणी प्रकाश कोंडूसकर व राजू होलम यांनी केली.गावागावात जाऊन वातावरण निर्मिती करणार गोव्यात समाविष्ट करण्यासाठी व झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन नागरिकांत जनजागृती करणार आहे असे तानाजी देसाई व संजय तळेकर यांनी सांगितले.
Kolhapur: शासनाकडून वारंवार अन्याय, आम्हा आजरावासियांना गोवा राज्यात पाठवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:29 IST