राधानगरी पन्हाळा आणि गगनबावडा या तीन तालुक्यांतील सुमारे ६0 /७0 वाड्या-वस्त्यांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी फायद्याच्या ठरणाऱ्या या प्रकल्पाचे काम नोव्हेंबर २000 मध्ये सुरू झाले होते. ३.८५ टीएमसी क्षमता आणि १४00 भिजक्षेत्र असणारा हा प्रकल्प गेली वीस वर्षे रखडला असून गेली बारा तब्बल वर्षे सलगपणे काम राखडल्यामुळे धामणी खोऱ्याचे अपरिमित असे नुकसान झाले आहे. या खोऱ्यातील जनतेने या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी मोर्चे, आंदोलने, निवडणुकीवर बहिष्कार आदी विविध मार्गांचा अवलंब केला व शासनाला जाग आणली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार प्रकाश आबिटकर, आ. पी. एन. पाटील, आ. विनय कोरे यांच्यासह माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे मोठे योगदान मिळाल्याने हा प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे
गतवर्षी या प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध झाली होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पुढील कार्यवाही झाली नाही. या प्रकल्पासाठी सध्याच्या सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १00 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे यावर्षी पुन्हा दिनांक १४ मे रोजी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग यांनी सुमारे ३१४ कोटी रुपयांची फेरनिविदा प्रसिद्ध केली आहे.