पेरणोली : सहकारी संस्थांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून केवळ नफा मिळवण्याचा उद्देश न ठेवता सामाजिक बांधिलकी जोपासावी. रवळनाथ हौसिंग सोसायटीचा उद्देश सामाजिक बांधिलकी असल्याने त्यासाठी 'रवळनाथ' नेहमीच कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी केले.
पेरणोली (ता. आजरा) येथील केंद्रीय मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना रवळनाथ हौसिंग सोसायटीतर्फे खेळाचे गणवेश वाटप करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच उषा जाधव होत्या.
चौगुले म्हणाले, खेळामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवावे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेकडून गणवेश वाटप करण्यात आले आहे. गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिकसोबत खेळातही विकास होणे महत्त्वाचे आहे.
उद्योजक गणपती नाईक म्हणाले, शिक्षण हेच सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे शिक्षणात तडजोड न करता ध्येयपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी. यावेळी ३० विद्यार्थ्यांना चौगुले यांच्या हस्ते गणवेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपसरपंच उत्तम देसाई, उपप्राचार्य प्रा. राजीव टोपले, नूरजहाँ सोलापुरे, रणजित कालेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. वासुदेव मायदेव, आजरा शाखाध्यक्ष विनायक आजगेकर, कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मायदेव, विष्णू पोवार, वीणा रेळेकर, ऊलय कोडक, उत्तम दळवी, जयश्री वरेकर, कविता नाईक आदी उपस्थित होते.
व्यवस्थापन अध्यक्ष कृष्णा सावंत यांनी प्रास्तावित केले. मुख्याध्यापिका स्नेहा क्षीरसागर यांनी स्वागत केले. अनुष्कार गोवेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुप्रिया पाटील यांनी आभार मानले.
-------------------------
फोटो ओळी : पेरणोली (ता. आजरा) येथील प्राथमिक शाळेत खेळाचे गणवेश वाटप करताना एम. एल. चौगुले. शेजारी सरपंच उषा जाधव, कृष्णा सावंत, गणपती नाईक, राजीव टोपले, उत्तम देसाई, दत्तात्रय मायदेव, प्रकाश देऊसकर आदी उपस्थित होते.
क्रमांक : २५०३२०२१-गड-०५