राम मगदूम गडहिंग्लज: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात मनोमिलन होण्याचे संकेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक माजी आमदार राजेश पाटील आणि जेष्ठ नेते शरद पवार यांच्या समर्थक डॉ.नंदिनी बाभूळकर हे पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाल गतीमान झाल्या आहेत.गुरूवारी(३०) रात्री झालेल्या संयुक्त बैठकीत युतीसह जागा वाटपाबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याचे खात्रीलायकरित्या समजते.२०१९ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर व त्यांच्या कन्या डॉ .नंदिनी बाभुळकर यांनी असमर्थता दाखवली.त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ राजेश पाटील यांच्या गळ्यात पडली.मात्र, निवडणुकीनंतर राजेश पाटील आणि संध्यादेवी कुपेकर यांच्यात दुरावा निर्माण झाला.त्यानंतर जिल्हा मजूर संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीत पडलेली उभी फूट कायम राहिली.दरम्यान,राज्य पातळीवर राष्ट्रवादीत फुट पडल्यावर राजेश पाटील हे अजित पवार यांच्यासोबत राहिले तर संध्यादेवी कुपेकर ह्या शरद पवार यांच्यासोबत राहिल्या.परिणामी, राजेश पाटील व डॉ.बाभुळकर यांना गेल्यावर्षीची विधानसभा निवडणुक एकमेकांच्या विरोधात लढवावी लागली.त्याचाच फायदा उठवून शिवाजीराव पाटील यांनी थेट आमदारकीलाच गवसणी घातली.त्यांना रोखण्यासाठीच आता राजेश पाटील व डॉ.बाभूळकर यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
दोघांनीही समान वाटणी!जिल्हापरिषदेच्या गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील प्रत्येकी चारपैकी दोन - दोन जागा दोघांनी वाटून घ्यायच्या आणि आजऱ्यातील एक जागा मुश्रीफ यांना सोडण्याचा निर्णय झाल्याचा समजते.विधानसभेला मदत केलेल्या अन्य मित्र पक्षांनाही आपल्या वाट्याला आलेल्या जागांमध्येच सामावून घ्यायचे यावरही एकमत झाल्याचे समजते.
एकत्र येण्याचे कारण काय?भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी विधानसभेला त्यांच्या विरोधात लढलेले 'दौलत - अर्थव'चे प्रमुख 'जनसुराज्य'चे मानसिंगराव खोराटे आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अप्पी पाटील यांना आपल्यासोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.त्यामुळेच राजेश पाटील व डॉ.बाभूळकर यांनाही एकत्र आल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
मुश्रीफ यांचाच पुढाकार!गेल्या आठवड्यात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यातील काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुकांशी चर्चा करून महाविकास आघाडीची मोट बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या. म्हणूनच, माजी आमदार राजेश पाटील व डॉ.बाभूळकर यांना एकत्र आणण्यासाठी जिल्हयाचे जेष्ठ नेते मंत्री हसन मुश्रीफ पुढाकार घेतल्याची चर्चा आहे.
लवकरच 'युती'ची घोषणा !जिल्हा मजूर संघाच्या गेल्या निवडणुकीत तत्कालीन आमदार राजेश पाटील आणि माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या समर्थकांत उभी फूट पडली.त्याचीच किंमत विधानसभेला दोघांनाही चुकवावी लागली.दरम्यान, जिल्हा मजूर संघाच्या सत्ता संघर्षात पुन्हा दोघे एकत्र आले आहेत.त्यामुळे एकत्र आलेल्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी दोघांवरही दबाव आणल्याने मनोमिलन सुकर झाले आहे. प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राजेश पाटील व डॉ.बाभूळकर यांच्यात आतापर्यंत चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या असून लवकरच नव्या 'युती' ची घोषणा होईल.
Web Summary : Ahead of local elections, factions of NCP in Chandgad, led by Rajesh Patil and Nandini Babhulkar, are considering reuniting. This move is aimed at countering BJP's growing influence and regaining political ground, with Hasan Mushrif facilitating talks.
Web Summary : स्थानीय चुनावों से पहले, राजेश पाटिल और नंदिनी बाहुलकर के नेतृत्व में चंदगढ़ में एनसीपी के गुट फिर से एकजुट होने पर विचार कर रहे हैं। इस कदम का उद्देश्य भाजपा के बढ़ते प्रभाव का मुकाबला करना और राजनीतिक जमीन हासिल करना है, जिसमें हसन मुश्रीफ बातचीत की सुविधा प्रदान कर रहे हैं।