भारत चव्हाणकोल्हापूर : कोल्हापूर ही कलेची खाण, कलाकृतींची जाण आणि कलाकारांचा सन्मान करणारी कलानगरी आहे. या नगरीचा स्पर्श झालेले कलाकार आणि कलाकृती बहुसंख्य वेळेला अजरामर होऊन राहतात, हे अनेक उदाहरणांवरून सिद्ध झालेले आहे. त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे शोमन राज कपूर होत..! राज कपूर यांची आज, शनिवारी १०० वी जयंती साजरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज कपूर आणि कोल्हापूर यांच्यातील स्नेहाच्या संबंधांना उजाळा मिळाला.कोल्हापूरकडे चित्रपटांची जननी म्हणूनही पाहिले जाते. येथील रसिकांनी जसे कलेवर प्रेम केले तसे कलाकारांवरदेखील अफाट प्रेम केले. इथवरच येथील चित्रपट रसिक थांबला नाही, तर आपल्या आवडत्या कलाकारांच्या स्मृती आजही त्याने जपल्या आहेत. रसिकांचे अवीट प्रेम लाभलेले अनेक कलाकार आहेत. अभिनेते राज कपूर यांनाही अशाच एका चाहत्याचे प्रेम लाभले.सर्वसामान्य माणूस हा राज कपूर यांच्या चित्रपटाचे कथानक असायचे. त्यामुळे चित्रपट पाहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला आपले आयुष्यच राज कपूरच्या अभिनयातून पाहायला मिळायचं. सर्वसामान्यांच्या व्यथा मांडताना रसिकांना एक चांगला संदेश चित्रपटातून देण्याची त्यांची वेगळी हातोटी होती. अशा या राज कपूर यांची चित्रपट कारकीर्द कोल्हापुरातून सुरू झाली. पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत कोल्हापूरला आलेल्या बारा वर्षांच्या राज कपूर यांना स्वर्गीय भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटात नारदाची भूमिका मिळाली.या अभिनेत्याचे अर्धाकृती पुतळ्याच्या स्वरूपात कोल्हापुरात स्मारक उभे राहिले आहे. हे स्मारक देशातील पहिले स्मारक आहे. महापालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी स्वर्गीय संभाजी पाटील व त्यांच्या पत्नी स्वर्गीय रंजना पाटील दोघे राज कपूर यांचे चाहते होते. स्वत:च्या आई-वडिलांइतकेच प्रेम संभाजी व रंजना यांनी राज कपूर यांच्यातील कलेवर केले. त्यांच्या निधनानंतर प्रत्येक वर्षी ते स्वखर्चाने श्राद्ध घालायचे. कोणी हसायचे, तर कोणी कौतुक करायचे; पण संभाजी, कोणी काही म्हणोत आपली श्रद्धा ढळू द्यायची नाही, या मुद्यावर ठाम राहिले.पुण्यतिथीच्या एका कार्यक्रमात लोकवर्गणीतून राज कपूर यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला. तत्कालीन महापौर आर. के. पोवार, भीकशेट पाटील, प्रल्हाद चव्हाण, दिलीप मगदूम, विक्रम जरग, रामभाऊ चव्हाण, बबन कोराणे, भारत चव्हाण, दिग्दर्शक वाय. जी. भोसले, लाला गायकवाड अशा मंडळींनी पुढाकार घेऊन संभाजींचे स्वप्न पूर्ण केले. जुना वाशीनाका चौकात राज कपूर यांचा पुतळा उभा केला. हा पुतळा शिवाजी पेठेतील प्रतापसिंह जाधव यांनी ब्रॉंझपासून बनविला आहे. त्याचे अनावरण १९९४ मध्ये अभिनेते शशी कपूर यांच्या हस्ते झाले. या पुतळ्याला सुनील दत्त, रणधीर कपूर, राजीव कपूर, करिष्मा कपूर यांनी भेट दिली आहे.
Raj Kapoor 100th Birth Anniversary: अभिनेत्याचे देशातील पहिले स्मारक, लोकवर्गणीतून कोल्हापूरकरांनी उभारला राज कपूर यांचा अर्धपुतळा
By भारत चव्हाण | Updated: December 14, 2024 15:38 IST