कच्चा मालाच्या दरवाढीने उद्योगांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 11:27 AM2021-11-15T11:27:34+5:302021-11-15T11:29:08+5:30

पिग आर्यन, कॉपर, निकल, आदी कच्चा मालाच्या दरवाढीने नवी अडचण उद्योगांसमोर उभारली आहे. गेल्या दीड वर्षांत कच्च्या मालाचे दर १५ ते १५० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

Raising raw material prices poses a new challenge to the industry | कच्चा मालाच्या दरवाढीने उद्योगांची अडचण

कच्चा मालाच्या दरवाढीने उद्योगांची अडचण

googlenewsNext

संतोष मिठारी
कोल्हापूर : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती आणि आव्हानांचा सामना करत कोल्हापुरातील उद्योगचक्र सुरू आहे. कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव, ऑर्डर्सचे वाढलेले प्रमाण, मनुष्यबळाची उपलब्धता, आदी पूरक घटकांच्या सहाय्याने फौंड्री हब असलेले औद्योगिक क्षेत्र पूर्वपदावर येण्यासाठी धडपडत आहे. मात्र, पिग आर्यन, कॉपर, निकल, आदी कच्चा मालाच्या दरवाढीने नवी अडचण उद्योगांसमोर उभारली आहे. गेल्या दीड वर्षांत कच्च्या मालाचे दर १५ ते १५० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

ऑर्डर्सचे प्रमाण वाढल्याने हातात काम असूनही उद्योजकांना गती घेता येत नाही. जिल्ह्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योग पूर्वपदावर येणे आवश्यक आहे. ते लक्षात घेऊन कच्चा मालाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने गांभीर्याने आणि लवकर लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी उद्योजकांतून होत आहे. जगातील विविध देशांनी चीनवर अलिखित बहिष्कार टाकल्याने कास्टिंगसाठी कोल्हापुरातील फौंड्रीच्या ऑर्डर्स सरासरी १५ टक्क्यांनी वाढल्या. त्यामुळे साहजिकच औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांचे काम वाढले. जुलै-ऑगस्टच्या तुलनेत विचार करता कारखान्यांमधील काम ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत पूर्वपदावर आले आहे. 

उद्योजक काय सांगतात?


ऑर्डर्स चांगल्या आहेत. मात्र, कच्चा मालाचे वाढते दर अडचणीचे ठरत आहेत. सध्या उत्पादनाची क्षमता बहुतांश कारखाने दोन ते तीन शिफ्टमध्ये सुरू आहेत. औद्योगिक क्षेत्र पूर्वपदावर येत आहे.  -उत्तम पाटील, शिरोली एमआयडीसी


कच्चा मालाचे दर वाढत असल्याने उद्योगांच्या भांडवलावर ताण पडत आहे. दिवाळीनंतर थोडासा स्लोडाऊन दिसत आहे. उद्योगचक्राची गती वाढण्यासाठी कच्चा मालाचे दर कमी होणे खूप आवश्यक आहे. -दिनशे बुधले, सचिव, कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशन

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचे काम निश्चितपणे वाढले आहे. ते पूर्ण करण्यात कच्चा मालाच्या वाढणाऱ्या दराचे आव्हान आहे. ते दूर झाल्यास कामाची गती आणखी वाढणार आहे. -गोरख माळी, अध्यक्ष, मॅक

जुलै २०२२ पर्यंतच्या कामाच्या ऑर्डर्स जिल्ह्यातील विविध कारखान्यांना मिळाल्या आहेत. मात्र, महिन्यागणिक पिग आर्यन, स्क्रॅप, आदी कच्चा मालाचे दर वाढत आहेत. त्यामुळे उद्योजकांची अडचण होत आहे. कच्चा मालाचे दर नियंत्रणात ठेवण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने लवकर लक्ष देणे आवश्यक आहे. - श्रीकांत पोतनीस, गोकूळ शिरगाव एमआयडीसी

 

असे वाढले कच्चा मालाचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

कच्चा माल                                    डिसेंबर २०१९             डिसेंबर २०२०                         नोव्हेंबर २०२१
पिग आर्यन                                     ३०.४७                         ३३.५५                                                 ५०

सीआय स्क्रॅप                                    ३०.५०                         ३८                                                 ४८.५०
एमएस स्क्रॅप                                     २६                              ३७                                                 ४७.५०

कोळसा                                            ३३.५०                           ३३                                                  ४९
फेरो सिलीकॉन                                 १३०                               -                                                    २२०

फेरो मॅन्गेनिज                                  ८८                                 -                                                   २४०


तर, फौंड्री उद्योग बंद पडणार


-फौंड्री उद्योग सुरू झाला असला, तरी मोठ्या समस्यांना तोंड देत आहे. कामे कमी झाली असून त्यातही आठवड्यातील तीन दिवस बंद ठेवावे लागत आहेत. पिग आर्यन, कोळसा, सिलीकाॅन, मॅग्नीज, सीआय स्क्रॅप मटेरियलचे दर दुप्पट झाले आहेत. 
-कच्चा मालाच्या वाढीव किमतीप्रमाणे मोठ्या कंपन्या वाढीव दर देत नाहीत. त्यामुळे कोल्हापुरातील फौंड्री उद्योजक हा नुसता हमालीच करत आहे. कच्च्या मालातील दरवाढ अशीच सुरू राहिली, तर फौंड्री उद्योग बंद पडेल. 
-केंद्र, राज्य शासनाने, लोकप्रतिनिधींनी यात वेळीच लक्ष घालून दरवाढ कमी करण्यासाठी तातडीने उपाय करावेत, अशी मागणी फौंड्री उद्योजक हिंदूराव कामते यांनी केली.


दरमहा लागतो ८० हजार टन कच्चा माल


जिल्ह्यात दरमहा ७५ हजार टन कास्टिंगचे उत्पादन होते. त्यासाठी पिग आर्यन, स्क्रॅॅप, कॉपर, निकल, फेरोऑलॉई, फेरोसिलिकॉन असा सुमारे ८० हजार टन कच्चा माल लागतो. त्याची एकूण किंमत सुमारे ८०० कोटींपर्यंत जाते. या कच्च्या मालाचा पुरवठा मुंबई, पुणे, जालना, नागपूर, गोवा, चेन्नई, विशाखापट्टणम येथून होतो.


आकडेवारी दृष्टिक्षेपात
कोल्हापूर विभागातील फौंड्रींची संख्या : ३००
कामगारांची संख्या : दीड लाख
दरमहा उत्पादन : ७५ हजार टन
वार्षिक उलाढाल : एक हजार कोटी


औद्योगिक वसाहतनिहाय उद्योगांची संख्या
शिवाजी उद्यमनगर : ८५०
शिरोली            : १०००
गोकुळ शिरगाव : ८००  
कागल हातकणंगले : ४५०         

Web Title: Raising raw material prices poses a new challenge to the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.