निपाणी : कर्नाटक राज्य परिवहन खात्याचे चिकोडीतील विभागीय नियंत्रण अधिकारी जी. व्ही. श्रीनिवास यांच्या चिकोडीतील महावीर नगर येथील राहत्या घरासह कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले. तब्बल चार तास येथे झाडाझडती घेऊन महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, डायरींची छाननी केली. तसेच म्हैसूर येथील त्यांच्या निवासस्थानासह बेळगाव येथील फार्म हाऊसवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले.नियंत्रण अधिकारी श्रीनिवास गेल्या तीन महिन्यांपासून चिकोडी येथे कार्यरत आहेत. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक चिकोडीतील त्यांच्या निवासस्थानासह निपाणी-मुधोळ मार्गावरील श्रीराम मंदिराजवळील विभागीय कार्यालयातील कागदपत्रांची छाननी केली. यावेळी श्रीनिवास यांचे लॅपटॉप, डायरी आणि महत्त्वाची कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. अचानक टाकलेल्या या धाडीमुळे चिकोडीसह निपाणी परिसरातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.म्हैसूरचे लोकायुक्त निरीक्षक डी. गोपाळकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली म्हैसूरच्या पाच आणि बेळगाव येथील चार अशा नऊ अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. या कारवाईत काय निष्पन्न झाले याबाबतची अधिक माहिती मिळू शकली नाही. (प्रतिनिधी)
चिकोडी आगार नियंत्रकांच्या घरांवर छापे
By admin | Updated: October 19, 2014 00:45 IST