कोल्हापूर : शिंगणापूर (ता. करवीर) फाटा येथे तीनपानी पत्त्याच्या जुगार अड्डयावर करवीर पोलिसांनी छापा टाकून सातजणांवर कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी रोकडसह दुचाकी, मोबाईल संच असा सुमारे १ लाख १९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी रात्री उशिरा केली.
गुन्हे नोंद झालेले असे : सुनील शंकर शिंदे (वय ३६, रा. गणेशनगर, शिंगणापूर), रोहित लक्ष्मण झोंजगे (३०, रा. हणमंतवाडी), वैभव मारुती गुरव (२७), वैभव दत्तात्रय माने (२५, दोघेही रा. शिंगणापूर), रोहित विष्णू तळेकर (३०, रा. फुलेवाडी, रिंगरोड), अभिजित सुरेश पाटील, अमर हिंदूराव पाटील (रा. कोल्हापूर).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिंगणापूर फाटा येथील अभिजित पाटील याच्या घरात तीनपानी पत्त्याचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळल्यावरुन पोलिसानी तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे अमर हिंदूराव पाटील हा स्वत:च्या फायद्यासाठी तेथे पत्त्याचा जुगार खेळ चालवत असल्याचे निदर्शनास आले. या छाप्यात सातजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून, सुमारे १५२० रुपयांसह मोबाईल, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई करवीर पोलीस ठाण्याचे पो. नि. संदीप कोळेकर यांच्या पथकाने केली.