परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड या कार्यालयातील लेखापरीक्षणाचा आढावा घेतला. यात नवीन वाहनांची नोंदणी करताना २०१८ ते २०२० या कालावधीत ६१३ नव्या वाहनांची किमत कमी दाखविली. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत १ कोटी २३ लाख ३७ हजारांचा कर कमी जमा झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने लेखा परीक्षणातील त्रुटीची पडताळणी तातडीने सुरू केली आहे. शासनाचा कर चुकविण्यासाठी कोणी जाणीवपूर्वक हा प्रकार केला आहे का? यात कोणी अधिकारी कर्मचारी वा वाहन वितरकाचा समावेश आहे का? याचीही माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एकाच प्रकारच्या वाहनांच्या किमती सातत्याने बदलत असतात. रंग, ॲक्सेसरीजनुसार वाहनांच्या किमतींमध्ये बदल होऊ शकतो. कर कमी भरलेली सर्व वाहने चारचाकी आहेत. कर यासंबधीचीही पडताळणी विचारात घेतली जात आहे. सर्व बाजूंनी याबाबतची पडताळणी सुरू आहे.
कोट
लेखापरीक्षणात ठपका ठेवण्यात आलेल्या त्रुटींची पडताळणी सुरू करण्यात आली असून त्याचा अहवाल तयार करून तो वरिष्ठ कार्यालयास पाठविला जाईल. त्रुटी दूर करून दोषींवर कारवाई होईल.
- डाॅ. स्टीव्हन अल्वारीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर
वाहनांचा कर असा,
वाहन प्रकार किंमत खासगी व्यावसायिक
पेट्रोल १० लाख ११ टक्के २० टक्के
१० ते २० लाख १२ टक्के २० टक्के
२० लाखांवर १३ टक्के २० टक्के
डिझेल १० लाख १३ टक्के २० टक्के
१० ते २० लाख १४ टक्के २० टक्के
२० लाखांच्यावर १५ टक्के २० टक्के
सीएनजी - १० लाख ७ टक्के १४ टक्के
एलपीजी १० ते २० लाख ८ टक्के १६ टक्के
२० लाखांच्यावर ९ टक्के १८ टक्के