दर्जेदार समीक्षाग्रंथाचा होणार ‘डॉ. म. सु. पाटील’ पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 10:16 AM2019-03-22T10:16:17+5:302019-03-22T10:19:53+5:30
कोल्हापूर : ख्यातनाम समीक्षक व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. म. सु. पाटील यांचे कुटुंबीय आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरतर्फे दर ...
कोल्हापूर : ख्यातनाम समीक्षक व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. म. सु. पाटील यांचे कुटुंबीय आणि शिवाजी विद्यापीठकोल्हापूरतर्फे दर दोन वर्षांनी ‘डॉ. म. सु. पाटील पुरस्कार’ हा दर्जेदार समीक्षाग्रंथास दिला जाणार आहे.
समीक्षा, वैचारिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी म. सु. पाटील कुटुंबीयांच्या वतीने पाच लाख रुपये विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या देणगी रकमेच्या व्याजातून हा पुरस्कार दिला जाणार आहे.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, म. सु. पाटील कुटुंबातील कवयित्री नीरजा, शंकर अय्यर, तृप्ती शंकर, अनुराधा मोकल, वित्त व लेखा अधिकारी व्ही. टी. पाटील, प्राचार्य कणसे, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस, रणधीर शिंदे हे उपस्थित होते.
भारतीय साहित्यशास्त्रात महत्त्व
म. सु. पाटील हे मराठीतील नामवंत समीक्षक असून, मनमाड (खानदेश) महाविद्यालयात त्यांनी दीर्घकाळ प्राचार्य म्हणून काम केले आहे. त्यांचे आजवर दहाहून अधिक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. मराठी समीक्षा लेखन परंपरेत त्यांनी केलेली समीक्षा मुलभूत स्वरूपाची आहे.
मराठी वाङमयीन नियतकालिकांच्या विस्तारात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. प्राचीन कवितेबरोबर त्यांनी आधुनिक कवितेची केलेली समीक्षा महत्त्वाची ठरली आहे. त्यांनी मांडलेला तृष्णाबंध साहित्यविचार हा भारतीय साहित्यशास्त्रात महत्त्वाचा गणला गेला आहे.