हातकणंगले बाजारपेठेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शंभर टक्के लॉकडाऊन होते. लॉकडाऊन असतानाही हातकणंगले पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी ऑफिसमधील समारंभ आणि सत्काराच्या कार्यक्रमासाठी बाजारपेठेतील एका कापड दुकानदाराला सकाळी बंद दुकान उघडायला लावून कपडे, साड्या, शाल यांची खरेदी केली. खरेदी संपवून पोलीस कर्मचारी ठाण्यामध्ये दाखल होताच
हातकणंगले बाजारपेठेमध्ये कापड दुकान उघडे असल्याची माहिती अज्ञाताकडून तहसीलदारांना फोनवरून मिळाली. तालुका दंडाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या प्रभारी असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षकांना कारवाईचे आदेश दिले. पोलिसांची मात्र पंचायत झाली. त्यांनी बाजारपेठेतील कापड दुकानावर पाच हजार रुपयांच्या दंडाची कारवाई केली. व्यापाऱ्याची पोलिसांच्या या दुटप्पी कारवाईने मोठी अडचण झाली. पोलिसांच्या सोयीसाठी व्यापाऱ्याकडे खरेदी करायची आणि पुन्हा काम झाल्यावर व्यापाऱ्यावरच दंडात्मक कारवाई करायची, या घटनेबद्दल संताप व्यक्त होत आहे.