कोपार्डे : कोरोना काळात वीज बिल रीडिंग घेतले नाही, जनतेला ती माफ करण्याचे आश्वासन दिले; मात्र आता महावितरणने एकत्रित वीज बिले दिली आहेत. याशिवाय यावर थकबाकी दाखवीत व्याज दंड आकारला आहे. वीज बिल थकबाकीसाठी महावितरणने वीज तोडू नये यासाठी दलित महासंघाने निदर्शने करून निवेदन दिले.
यावेळी दलित महासंघ करवीर तालुका कार्याध्यक्ष सागर बोरुडे म्हणाले, राज्य शासनाने ऊर्जामंत्रीने वीज बिल माफ करतो म्हणून जाहीर केले. त्यातच महावितरणकडून दर महिन्याला मीटर रीडिंग घेऊन वीज बिल घरपोच केली नाहीत. यामुळे वीज ग्राहकांत वीज बिल अदा करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला. वीज मीटर रीडिंग झाले नसल्याने हे वीज बिल माफ होणार म्हणून ग्राहकांकडून भरले गेले नाही. आता महावितरणचे कर्मचारी वीज बिल भरले नाही म्हणून घरगुती व कृषी पंपाची वीज कनेक्शन तोडत आहेत, हे थांबवावे व जनतेला वेठीस धरू नये.
महावितरणच्या कुडित्रे शाखेसमोर निदर्शने करून अभियंता पी. एस. चौगुले यांना निवेदन देण्यात आले. मनसेकडून कामे अपूर्ण असताना कंत्राटदारांना बिले अदा केल्याबद्दल धारेवर धरण्यात आले. यावेळी शाखा अभियंता पी. एस. चौगुले यांनी ९० टक्के काम पूर्ण झाल्यामुळे आपण कंत्राटदाराला बिल अदा करण्याबाबत रवाळ दिला होता. काही तांत्रिक कारणामुळे उर्वरित दहा टक्के काम झाले नसल्याने या त्रुटी दूर करीत तेही काम पूर्ण केले आहे असे सांगितले.
यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, शरद जाधव दलित महासंघाचे सागर बुरूड, सर्जेराव पाटील, प्रल्हाद गुरव उपस्थित होते.
फोटो
थकीत वीज बिलासाठी घरगुती व कृषी पंपाची वीज बिले तोडू नये या मागणीचे निवेदन शाखा अभियंता पी. एस. चौगले यांना देताना दलित महासंघाचे सागर बुरूड, सर्जेराव पाटील, प्रल्हाद गुरव.