कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या (केडीसीसी) ४६ माजी संचालक व १२ अधिकाऱ्यांवरील एक कोटी ७५ लाख रुपयांची जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यासाठी चौकशी अधिकारी सचिन रावळ हे गेल्या तीन दिवसांपासून बँकेच्या मुख्यालयात ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे या माजी संचालकांचे धाबे दणाणले आहेत.बँकेच्या कर्जवाटपात अनियमितता व विनातारण कर्जवाटप झाल्यामुळे बँकेचे नुकसान झाल्याचा ठपका या संचालकांवर ठेवण्यात आला आहे. त्याच्या चौकशीची प्रक्रिया २००९ पासून कासवगतीने सुरू आहे. सुरुवातीला तत्कालीन जिल्हा उपनिबंधक धनंजय डोईफोडे यांनी ही चौकशी सुरू केली. त्यांच्या काळात काही सुनावण्याही झाल्या. परंतु, त्यांची बदली झाल्यावर चौकशी पुन्हा ठप्प झाली. त्यानंतर सचिन रावळ यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. परंतु, त्यांचीही सोलापूरला प्रादेशिक साखर सहसंचालक म्हणून बदली झाल्यावर पुन्हा ही प्रक्रिया रेंगाळली. त्याची दखल घेऊन विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी ही जबाबदारी तातडीने निश्चित करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. म्हणून रावळ गेले तीन दिवस बँकेच्या मुख्यालयात ठाण मांडून बसले आहेत. या प्रकरणातील संचालकांचे अंतिम म्हणणे यापूर्वीच सादर झाले आहे. येत्या आठवड्याभरात नुकसानीची जबाबदारी निश्चित करून त्याचा अहवाल दराडे यांच्याकडे सादर केला जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
प्रचार तप्त; मतदार संतप्त
By admin | Updated: October 7, 2014 00:44 IST