कोल्हापूर : धनगर समाजाला हक्काचे आरक्षण न देणाऱ्या व कायद्याची पायमल्ली करणाऱ्या कॉँग्रेस आघाडी सरकारचा आज, सोमवारी धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे कोल्हापुरात जाहीर निषेध करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचे पुढील राजकीय धोरण काय असावे? यासाठी लवकरच समाजाचा राज्यव्यापी मेळावा घेण्याचा निर्णयही यावेळी झाला. ‘यळकोट... यळकोट... जय मल्हार...’, च्या जयघोषाने सभागृह दणाणले. यावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे धनगर समाज आरक्षण कृती समिती तर्फे कॉँग्रेस आघाडी सरकारच्या निषेध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते रामाप्पाा करिगार होते.करिगार म्हणाले, समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी अनेकवेळा लढा देऊनही यश मिळाले नाही. शासनाने योग्य न्याय न दिल्याने अशा निष्क्रिय सरकारच्या निषेधाची घोषणा आपण करीत आहोत.बबनराव रानगे म्हणाले, राज्य शासनाने ६५ वर्षांत धनगर समाजावर अन्याय केला आहे. राज्यघटनेप्रमाणे या समाजाला आरक्षण असताना शासन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाच्या तरी दबावाखाली यावर निर्णय घेत नाही. आमचा कोणालाही विरोध नाही; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत धनगर समाजाला आरक्षण असताना त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे याचा उद्रेक झालेला आहे. गेल्या काही दिवसांत समाजाचे लाखो लोक रस्त्यावर उतरूनही सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुढील राजकीय धोरण ठरविण्यासाठी लवकरच धनगर समाजाचा राज्यव्यापी मेळावा घेण्यात येईल.प्रा. लक्ष्मण करपे म्हणाले, सम्राट चंद्रगुप्त मौर्यांचा धनगर समाज वारसदार आहे. त्यामुळे समाजाने प्रथम आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे.आपण गप्प बसलो, तर आपल्याला काहीच मिळणार नाही. आता रडायचे नाही, तर लढायचे. कृती समितीने आखून दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे वाटचाल करुया.छगन नांगरे यांनी आरक्षणाची वस्तुस्थिती मांडणारी कविता सादर करीत समाजावर नेहमीच अन्याय करणाऱ्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.राघू हजारे यांनी सरकारने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षण लागू केले तर त्याचे स्वागतच आहे, असे सांगितले. असे न झाल्यास कृती समितीच्या माध्यमातून या सरकारला गाडावे, अशा जाहिराती गावागावांत, घराघरांत समाज बांधवांनी वाटाव्यात. एक-एक मत सरकारच्या विरोधात जाईल यासाठी प्रसार करावा, अशा सूचनाही त्यांनी मांडल्या.यावेळी ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा गावडे, बयाजी शेळके, नागेश पुजारी, प्रल्हाद देबाजे, कोंडिबा बनगर, आदींसह कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कायदा न पाळणाऱ्या सरकारचा निषेध
By admin | Updated: September 2, 2014 00:10 IST