आजरा : दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि., कोल्हापूरच्या संचालक मंडळाने रिझर्व्ह बँक व महाराष्ट्र सरकार कायद्याच्या विरोधात कामकाज करून मोठा गैरव्यवहार केला आहे. याबाबत पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कोल्हापूर यांनी चौकशीसाठी उपनिबंधक कोल्हापूर शहर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पुरोगामीचे जिल्हा सरचिटणीस रवी शेंडे यांनी दिली.शेंडे म्हणाले, बँकेच्या संचालक मंडळाची मुदत डिसेंबर २०१३ला संपली असून, मुदत संपलेल्या संचालक मंडळाने मोठ्या आर्थिक खर्चाचे कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत, असे शासनाने आदेश दिले असताना प्रचंड भांडवली खर्च संचालक मंडळाने केला आहे. रिझर्व्ह बँक धोरणानुसार ग्रेड व लिक्विडी मेंटेन न केल्याने दोन वर्षांत २ लाख ५० हजारांचा दंड झाला आहे.कोअर बँकिंग व ए.टी.एम. सुरू करण्यासाठी एक कोटीची गुंतवणूक केल्याने बँकेला तोट्याला सामोरे जावे लागले. १३ सभासदांना ७० लाख ७६ हजारांची थकीत कर्जाची रक्कम मनमानी पद्धतीने माफ केली आहे. यासह विविध आरोप पुरोगामी ने केल्याने ही भूमिका जिल्हा उपनिबंधकांनी घेतल्याचे शेंडे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
प्राथमिक शिक्षक बँक गैरव्यवहार चौकशी सुरू
By admin | Updated: September 26, 2014 23:30 IST