रत्नागिरी : हवामान खात्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असतानाच गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली हाेती. या पावसामुळे आंबा व काजू पिकावर परिणाम हाेणार असल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत.
जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, दापोली या भागात पावसाने हजेरी लावली हाेती. उशिरापर्यंत लांबलेला पाऊस, उशिराने सुरू झालेली थंडी यामुळे यावर्षी आंबा पीक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. अजूनही काही ठिकाणी झाडांना माेहोर येण्याची प्रक्रियाच न झाल्याने आंबा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून थंडी जाणवू लागल्याने आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला हाेता. मात्र, गुरुवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंबा पिकाचा माेहोर काळा पडून गळून पडण्याची भीती आहे.
-------------------------------------------------------------------
कोल्हापुरात ढगाळ वातावरण
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासू्च पावसाला सुरुवात झाली होती. यावेळी थांबून-थांबून सरी कोसळत राहिल्या. गुरुवारी सकाळी नऊपर्यंत पावसाचे थेंब पडतच होते. दिवसभर ढगाळ वातावरण आणि तीननंतर काहीसे सूर्यदर्शन झाले तरी वातावरण कुंदच राहिले. दरम्यान, कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कायम राहणार असल्याने आज शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शनिवारपासून वातावरण निवळेल, असाही अंदाज आहे.
दरम्यान, गळीत हंगामावर अवकाळीची अवकृपा झाली असून, शिवारात चिखल झाल्याने ऊसतोडी खोळंबल्या आहेत. आधीच मजूर टंचाईमुळे तोडणी पत्रक विस्कटले असताना आता पावसाने घातलेल्या धिंगाण्याने ऊस उत्पादक, तोडणी मजुरांसह कारखाना यंत्रणेच्या तोंडाला फेस आला आहे.
दक्षिण-मध्य अरबी समुद्र ते उत्तर-मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार नाही, पण ढगांच्या गडगडासह येणाऱ्या बिगरमोसमी पावसाने जानेवारी महिन्यातील शेतीसह ऊस तोडणी, वीज भट्टी, गुऱ्हाळे आदी हंगामावर पाणी फिरवले आहे. हे सगळे हंगाम ऐन जोरात असताना अवकाळीने मोठा ‘ब्रेक’ लावला आहे.
-------------------------------------------------------------------
साताऱ्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग!
सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सततचे ढगाळ आणि पावसाचे वातावरण झाल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. यावर्षीची हाता-तोंडाशी आलेली पिके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याच्या धास्तीने शेतकरी चिंतेत पडला आहे.