कोल्हापूर : जनभावनेचा अनादर करीत टोलबाबत कोणताही निर्णय न घेणाऱ्या राज्य सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे संतप्त झालेल्या कोल्हापूरकरांनी लोकशाही मार्गानेच जोरदार प्रत्युत्तर देण्याचे ठरविले असून, त्यासाठी सोमवारी सकाळी काढण्यात येणाऱ्या महामोर्चाची सर्वपक्षीय कृती समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोमवारचा महामोर्चा गेल्या दोन महामोर्चांपेक्षा निश्चितच मोठा असेल, असा दावा कृती समितीचे नेते करीत आहेत. दरम्यान, शहरातील व्यापाऱ्यांनी सोमवारी दुपारपर्यंत व्यवहार बंद ठेवून मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीचे कार्यकर्ते बाबा पार्टे यांनी केली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील हजारो लोक मोर्चात सहभागी होणार आहेत. विविध राजकीय पक्षांसह विविध संघटना, संस्था, सार्वजनिक मंडळे, तालीम संस्था, महिला मंडळे या महामोर्चात सहभागी होतील. महामोर्चाच्या पूर्वतयारीकरिता कृती समितीने विविध प्रमुख चौकांतून आतापर्यंत सुमारे ४० हून अधिक जनजागृती सभा घेतल्या आहेत. मोर्चात सर्वच राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, गोविंद पानसरे, निवासराव साळोखे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुजित मिणचेकर, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा निघणार आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता गांधी मैदान येथे जमण्याचे आवाहन केले आहे. महामोर्चाचा मार्ग असा राहीलगांधी मैदान ते खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी, महापालिका, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय.महाराष्ट्र विकास आघाडी टोल महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र विकास आघाडीने बैठकीत केले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष किरण कांबळे होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संदीप संकपाळ, जिल्हा उपाध्यक्ष राजू कांबळे, गंगाधर म्हमाणे, प्रमोद कासारीकर, आदी उपस्थित होते.चेंबर आॅफ कॉमर्सटोलविरोधी महामोर्चामध्ये चेंबर आॅफ कॉमर्सच्या संलग्न संघटना, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, वाहतूकदार, आदींनी सहभागी होऊन तो यशस्वी करावा, असे आवाहन कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आनंद माने, उपाध्यक्ष सुरेंद्र जैन, उपाध्यक्ष संजय शेटे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.स्वातंत्र्यसैनिक संघटनामहामोर्चात जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्यसैनिक संघटना, वारस सहभागी हाणार आहेत. असे जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे सचिव सुंदरराव देसाई यांनी बैठकीत सांगितले. प्राचार्य व्ही. डी. माने अध्यक्षस्थानी होते. शिवसेना महामोर्चामध्ये शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महिला आघाडी व शिवसैनिकांनी या दिवशी हजर राहावे, असे आवाहन आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी केले आहे.शैक्षणिक व्यासपीठटोलविरोधी मोर्चास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी सदर टोलविरोधी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डी. बी. पाटील, एस. डी. लाड यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
महामोर्चाची जय्यत तयारी
By admin | Updated: June 8, 2014 01:06 IST