Prashant Koratkar ( Marathi News ) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर कोर्टाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आज कोर्टात एका वकिलाने कोरटकर याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आधी पोलिसांनी पाच दिवसांची कोठडी मागितली होती. पण युक्तिवाद ऐकून न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली. दरम्यान, कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाला. यावेळी वकील असीम सरोदे संतापल्याचे पाहायला मिळाले.
याआधी कोर्टाने प्रशांत कोरटकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. हे तीन दिवस संपल्यानंतर आता कोर्टाने पुन्हा एकदा दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. प्रशांत कोरटकर याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली तसेच ऑनलाईन पेमेंट कोणी केले यासह अन्य तपास बाकी आहे. यासाठी आणखी कोठडी हवी अशी वकिलांनी मागणी केली होती. यावेळी कोरटकर याच्या बाजूच्या वकिलांनी प्रशांत कोरटकर हा घरी एकटा कमावता आहे. त्याला एक मुलगी आहे, असा युक्तिवाद केला होता. यावेळी वकील असीम सरोदे आणि वकील सौरभ घाग यांच्यात खडाजंगी झाली.
Kolhapur: प्रशांत कोरटकरवर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न, सुनावणीनंतर कोर्ट परिसरातच गोंधळ
कोर्टात युक्तिवाद काय झाला?
न्यायाधीश एस.एस. तट यांच्यासमोर दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. त्यानुसार, आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली.सरकारी पक्षातर्फे सूर्यकांत पोवार तसेच इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे अॅड अशीम सरोदे ऑनलाई पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले होते. कोरटकर यांच्यातर्फे वकील सौरभ घाग उपस्थित होते. यावेळी कोर्टात आधी पोलिसांनी तपासाची माहिती दिली. तसेच आणखी तपासासाठी पोलिस कोठडीची आवश्यक्ता असल्याची मागणी केली.
आरोपी कोरटकरने याप्रकरणी काही नावं घेतली आहेत. खरंच त्यांचा सहभाग आहे का याची चौकशी करण्याची आहे. असा गंभीर गुन्हा असताना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी केली. दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य आरोपीने केलं आहे. या आरोपीला कोणत्या संघटनेने किंवा व्यक्तीने मदत केली आहे, का हा तपास करावा लागणार आहे, असंही सरकारी वकिलांनी सांगितले.
प्रशांत कोरटकरच्या वकिलांचा युक्तिवाद काय?
१ मार्च रोजी जामीन मिळाला होता. त्यावेळी चौरशीसाठी बोलवायला हवं होतं. जातीय तेढ निर्माण केली जाते असं नेहमी सांगितलं जातं. पण तो ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप कुणी व्हायरल केला? त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये मी हे संभाषण व्हायरल करतो असं म्हटलं आहे. फोन कॉल व्हायरल झाला त्याचवेळी कोरटकर यांनी नागपूरमध्ये पोलिसात तक्रार केली होते.पोलिसांनी सगळी चौकशी केली आहे.कोरटकर एक पत्रकार आहेत, त्यांचं एक चॅनेल आहे, घरामध्ये ते एकटेच कमावणारे आहेत, असा युक्तिवाद वकील घाग यांनी केला. यावेळी वकील असीम सरोदे संतापल्याचे पाहायला मिळाले. हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले
सुरक्षेच्या कारणासाठी कोरटकरला सकाळी आठ वाजता राजारामपुरी पोलिस कोठडीतून बाहेर काढले. त्या वेळी आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या जयदीप शेळके याला पोलिसांनी ताब्यात घेतले. झटापटीत त्याचा शर्टही फाटला. दुपारी बारा नंतर न्यायालयात सुनावणी झाली. त्यात सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी केलेल्या युक्तिवादानुसार त्याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. आरोपीचे वकील सौरभ घाग यांनी कोरटकर यांची बाजू मांडली.