कोल्हापूर : युवकांनी आपल्यातील हीन भावनेचा त्याग करून आत्मविश्वासाच्या बळावर जग जिंकावे. व्यसनांपासून दूर राहून, दुसऱ्यांच्या मदतीसाठी पुढे राहावे. युवकांमध्ये विश्व परिवर्तनाची ताकद आहे. ती ओळखून त्यांनी वाटचाल करावी, असे आवाहन युवा प्रभागाच्या राष्ट्रीय संयोजिका चंद्रिकादीदीजी यांनी केले. शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावर आज, रविवारी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय यांच्यावतीने आयोजित ‘मेगा यूथ फेस्टिव्हल’मध्ये त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रिकादीदीजी म्हणाल्या, युवक म्हणजे स्वत:सह इतरांना जगण्याला नवे बळ देणारी सकारात्मक ऊर्जा होय. या ऊर्जेला सकारात्मक दिशा दिली तर सर्वांनाच अपेक्षित असणाऱ्या सर्वांगसुंदर भारताची निर्मिती सहजपणे करता येणार आहे. यासाठी युवकांना विधायक कार्यासाठी लावले पाहिजे. आमदार क्षीरसागर म्हणाले, युवकांनी जबाबदारी ओळखली पाहिजे. देशासाठी आपण काय करता येईल याचा विचार करा. सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यांसमोर वाटचाल करा. शर्मा म्हणाले, युवक आपल्या अपेक्षा वाढवीत आहेत. मिळालेल्या गोष्टीत समाधानी नसल्याने त्यांच्यात नकारात्मक दृष्टिकोन वाढत आहे. याप्रसंगी महिला कुस्तीगीर रेश्मा माने, जलतरणपटू ऋतुजा देसाई, नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील, लेखिका सोनाली नवांगुळ, आंतरराष्ट्रीय सेलिंगपट्टू तारामती मतीवडे, महाराष्ट्राचा महागायक अभिजित कोसंबी यांचा सत्कार झाला. कार्यक्रमास कोल्हापूर सेवा केंद्राच्या प्रमुख सुनंदा बहेनजी, जिल्हा प्राचार्य संघटनांचे अध्यक्ष प्राचार्य सी. आर. गोडसे, शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. नारायणन, ब्रह्माकुमारी गोवा व सिंधुदुर्ग संचालिका बी. के. शोभादीदी, भारती विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेजच्या डॉ. संगीता चौगुले, आदी उपस्थित होते.
युवकांमध्ये विश्व परिवर्तनाची ताकद : चंद्रिकादीदी
By admin | Updated: December 15, 2014 00:23 IST