अतुल आंबी - इचलकरंजी --टपाल विभागाचे आधुनिकीकरण सुरू झाले असून, जिल्ह्यातील पहिले एटीएम मशीन इचलकरंजीत बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील नऊ टपाल कार्यालये कोअर बॅँकिंग प्रणालीद्वारे जोडण्यात आली असून, लवकरच उर्वरित सर्व कार्यालयेही या प्रणालीला जोडून आॅनलाईन करण्यात येणार आहेत. त्यामुळे टपाल कार्यालयांचे कामकाज आता बॅँकांच्या बरोबरीने 'हायटेक' होत आहे.टपाल खात्याचे जिल्ह्यातील पहिले एटीएम मशीन इचलकरंजीत बसविण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच ग्राहकांना ही सेवा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर व जयसिंगपूर येथे एटीएम मशीन बसविण्यात येणार आहे. पुढच्या टप्प्यात सर्व मुख्य टपाल कार्यालयांत एटीएम मशीन बसविले जाणार आहे. सुरुवातीला या एटीएम कार्डाद्वारे फक्त टपाल विभागाच्या खात्यावरीलच रक्कम काढता येणार आहे. मात्र, देशभरात सर्व टपाल कार्यालये आॅनलाईन पद्धतीने जोडणी झाल्यानंतर बॅँकेशी संलग्न करून बॅँकांप्रमाणे सर्व एटीएम मशीनमध्ये एकमेकाचे एटीएम कार्ड वापरता येणार आहे. त्यामुळे टपाल विभागातील व्यवहार आता सुलभ होणार आहेत.केंद्रीय विभागाच्या देखरेखीखाली चालणारा टपाल खात्याचा व्यवहार हा पारदर्शी व विश्वासार्ह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे साहजिकच ग्राहकांचा याकडे कल वाढून टपाल कार्यालयातील उलाढालही वाढेल. याला चालना देण्यासाठी शासनाच्यावतीनेही टपाल खात्याच्या माध्यमातून विविध ठेव योजना राबविल्या जात आहेत. सर्वच क्षेत्रात आता अत्याधुनिक सेवा-सुविधा आॅनलाईन पद्धतीने देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामध्ये सर्वांत जुना असलेला टपाल विभागही आता ‘हायटेक’ होत असल्यामुळे ग्राहकांतून समाधान व्यक्त होत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण अशी एकूण ४६६ पोस्ट कार्यालये असून, पहिल्या टप्प्यात नऊ मुख्य कार्यालये कोअर बॅँकिंग प्रणालीद्वारे जोडली आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर, रेल्वे स्टेशन, शाहूपुरी, शनिवार पेठ, इचलकरंजी, गडहिंग्लज, जयसिंगपूर, कुरुंदवाड यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ९६ कार्यालये आॅनलाईन जोडली जाणार आहेत. या पद्धतीने २०१८ पर्यंत सर्व टपाल कार्यालये या प्रणालीद्वारे जोडून आॅनलाईन सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बॅँकांमध्ये केले जाणारे सर्व व्यवहार टपाल कार्यालयात झाले तर नवल वाटायला नको.
टपाल विभागही होतोय ‘हायटेक’
By admin | Updated: April 8, 2015 00:31 IST