कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती लढतीचे चित्र

By विश्वास पाटील | Published: February 29, 2024 12:19 PM2024-02-29T12:19:06+5:302024-02-29T12:19:44+5:30

महायुतीचे ठरले : महाविकास आघाडीत जागेसह उमेदवारीचा घोळ सुरूच

Possibility of contest between Sanjay Mandlik and Shahu Chhatrapati in Kolhapur Lok Sabha Constituency | कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती लढतीचे चित्र

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती लढतीचे चित्र

विश्वास पाटील

कोल्हापूर : कोल्हापूरलोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हा गुंता मात्र सुटायला तयार नाही. बुधवारी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनी कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिवसेनेच्याच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ही जागा नक्की कोणता पक्ष लढवणार आणि मग त्या पक्षाचा उमेदवार कोण, असे दोन प्रश्न आहेत.

सध्याच्या राजकीय घडामोडी सुरू आहेत ते पाहता मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती अशी संभाव्य लढत दिसत आहे. तसे झालेच तर मुलाच्या पराभवाची परतफेड वडील करणार का, असे त्या लढतीचे स्वरूप असेल. काही राजकीय ट्विस्ट घडलाच तर महाविकास आघाडीकडून संभाजीराजे, संजय घाटगे, विजय देवणे किंवा अन्य कुणाला ही संधी मिळू शकते.

महायुतीकडून मंडलिक की अन्य कोण असा संभ्रम काही दिवस सुुरू होता. परंतु, आता त्यांनी प्रचारच सुरू केल्यामुळे त्यांची उमेदवारी नक्की समजली जाते. शिवसेनेच्या फुटीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठबळ दिल्यामुळे मंडलिक यांना डावलून अन्य कुणाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता धूसर वाटते. मंडलिक यांचे स्वत:च्या गटाचे कागल तालुक्यात मतदान आहे. शिवाय चंदगड व राधानगरी तालुक्यात त्यांना मानणारे आमदार आहेत या देखील त्यांच्या उमेदवारीस बळ देणाऱ्या बाबी आहेत. 

महाविकास आघाडीत काँग्रेसचे तीन आमदार आहेत. शिवाय दोन विधान परिषदेचे आमदार या पक्षाकडे आहेत. सर्व तालुक्यांत संघटना बांधणीही चांगली झाल्याने काँग्रेसने ही जागा आपल्याला मिळावी असा दावा केला आहे. काँग्रेसने १९९९ ला या जागेवर शेवटची निवडणूक लढवली आहे. तेव्हापासून ती राष्ट्रवादीकडे गेली. २००९ आणि २०१९ च्या लढतीत राष्ट्रवादीचाही पराभव झाला. आता राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर त्यांच्याकडे एकही आमदार नाही. लोकसभेला लढत द्यावी असे मजबूत संघटन नाही. परंतु, पडझडीच्या काळात व्ही.बी. पाटील हे पक्षासाठी पाय रोवून उभे राहिले आहेत. त्यांचीही निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे.

शिवसेना ठाकरे गटाची स्थितीही तशीच काहीशी आहे. मावळत्या निवडणुकीत शिवसेनेला कोल्हापूरने पहिल्यांदा दोन्ही खासदार दिले. परंतु, ते राजकीय साठमारीत शिंदे गटात गेले आहेत. शिवसेनेकडे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकही आमदार नाही. परंतु, त्या पक्षाबद्दल लोकांत हवा आहे. त्यामुळेच शिवसेना या जागेवरील हक्क सोडायला तयार नाही. शिवसेनेकडून माजी आमदार संजय घाटगे, चेतन नरके, विजय देवणे यांची नावे चर्चेत आहेत.

या इच्छुकांसोबतच अलीकडील काही दिवसांत दोन नावे जोरात पुढे आली. ती कोल्हापूरच्या राजघराण्याशी संबंधित आहेत. संभाजीराजे आणि शाहू छत्रपती हे दोघेही लढायला तयार आहेत. संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीत ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल त्या पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली तरच ते उमेदवार ठरू शकतात. तोपर्यंत गेल्या महिनाभरात शाहू छत्रपती यांचेही नाव स्पर्धेत सगळ्यात पुढे आले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्यात त्यांच्या उमेदवारीबाबत बऱ्याच बाबी स्पष्ट झाल्याचे समजते.

मूल्यांच्या लढाईसाठी ही निवडणूक लढवण्यास तयार असल्याची भूमिका शाहू छत्रपती यांनी घेतल्याचे समजते. त्यांच्याकडूनच संकेत मिळताच पवार यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांच्याशी चर्चा केली व काँग्रेसला ही जागा सोडावी यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे शब्द टाकल्याने ही जागा काँग्रेसलाच मिळणार असल्याच्या घडामोडी आहेत.

लोकसभेच्या २००९ च्या निवडणूकीत महाराष्ट्रात गाजलेल्या लढतीत दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष लढून राष्ट्रवादीच्या संभाजीराजे यांचा पराभव केला होता. म्हणजे मंडलिक विरुद्ध राजघराणे असे चित्र दुसऱ्यांदा कोल्हापूरच्या राजकारणात दिसणार आहे.

आमदार किती कुणाचे..?
काँग्रेस : ०३
राष्ट्रवादी : ०२
शिवसेना-शिंदे गट : ०१

  • गत निवडणुकीतील खासदार मंडलिक यांचे मताधिक्य : २,७० ५६८
  • विधानसभेच्या सर्व सहाही मतदार संघात मताधिक्य
  • कागलमध्ये सर्वाधिक ७१४२७ तर कोल्हापूर उत्तरमध्ये सर्वांत कमी २७६५५ मताधिक्य


गत निवडणुकीतील की फॅक्टर

  • धनंजय महाडिक यांच्या पक्षविरोधी भूमिकेबद्दलची नाराजी
  • सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय या टॅगलाइनखाली महाडिक यांना केलेला विरोध
  • पंतप्रधान मोदी यांच्याबद्दलची मतदारांत असलेली हवा
  • राज्यातील सत्तेचे मंडलिक यांना मिळालेले पाठबळ


विधानसभानिहाय मतदार असे (२३ जानेवारी २०२४ पर्यंत)

मतदारसंघ : पुरुष : स्त्री व एकूण

चंदगड - १५८४६६ : १५६६१५ : ३१५०९०
राधानगरी - १७१९७३ : १५९९०० : ३३१८८८
कागल - १६४१६२ : १६२०९६ : ३२६२६१
कोल्हापूर दक्षिण - १७३८९४ : १६७०९६ : ३४१०३३
करवीर - १६१३५१ : १४७८५० : ३०९२०१
कोल्हापूर उत्तर - १४३२६२ : १४५०६४ : २८८३४३.
एकूण मतदान : ९,७३१०८ : ९३८,६२१ : १९,११,७२९

Web Title: Possibility of contest between Sanjay Mandlik and Shahu Chhatrapati in Kolhapur Lok Sabha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.