मुख्य कार्यकरी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रविवारी पोर्ले तर्फ ठाणे येथील कोविड सेंटरला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी भेट दिली. सध्या सेंटरमध्ये ॲाक्सिजन बेडची संख्या २० असून, त्यात ३० ॲाक्सिजन बेड वाढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, कोविड सेंटरमधील बेडची पाहणी करून कोरोना रुग्णांच्या उपचाराबाबत चौकशी केली. सेंटरमधील ॲाक्सिजन पुरवठा शिल्लक साठ्याबाबत विचारपूस करत उपचारात हयगय होणार नाही काळजी घेण्याची सूचना तालुका प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. तसेच ग्रामपंचायतीला प्रत्येक नागरिकाची वाॅर्डवार ॲाक्सिमीटरने तपासणी करा तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा सज्जड सल्ला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना चव्हाण यांनी दिला.
याप्रसंगी माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळी, जिल्हा कोरोना समन्वयक प्रियदर्शनी मोरे, प्रातांधिकारी बी. आर. माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, तालुका आरोग्य अधिकारी अनिल कवठेकर, विस्तार अधिकारी बी. व्ही. कदम, ग्रामविकास अधिकारी विजयकुमार पाटील, तलाठी गगन देशमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी : ०९ पोर्ले कोविड सेंटर
पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा येथील कोविड सेंटरच्या सोयी-सुविधांबाबत चौकशी करताना मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण इतर अधिकारी वर्ग.