कोल्हापूर : वडगाव पोलिसांच्या मारहाणीतच जगदीश ऊर्फ सनी प्रकाश पोवार (वय २९, रा. शिवाजीनगर, वडगाव) याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत , या मृत्यू प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजीव पाटील यांच्यासह मारहाण करणाऱ्या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून तत्काळ निलंबित करण्याची मागणी पोवार याच्या नातेवाईक व मित्र परिवाराने केली. त्यानंतरच मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यास पोलिसांना परवानगी देऊ, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने सीपीआर आवारात तणाव निर्माण झाला. जगदीश पोवार यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वडगावमध्ये समजताच नातेवाईक व मित्र परिवारांनी सीपीआरकडे धाव घेतली. मृतदेह सीपीआरच्या अपघात विभागात ठेवण्यात आला होता. पोवार याचे नातेवाईक व मित्र परिवार आक्रोश करीतच अपघात विभागात घुसले. या दरम्यान राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. शा. पाटील मृतदेहाची पाहणी करीत होते. यावेळी वीस ते पंचवीस लोक आतमध्ये घुसल्याने गोंधळ उडाला. पोवारचा मृतदेह पाहून त्यांनी जोरजोरात आक्रोश करण्यास सुरुवात केली. वडगाव पोलिसांच्या मारहाणीमध्ये पोवार यांचा मृत्यू झाल्याचा यावेळी त्यांनी आरोप केला. दरम्यान, या वृत्तामुळे आठवले गटाचे प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, एन. जी. सनदी, मंगलराव माळगे हे कार्यकर्त्यांची फौज घेऊनच सीपीआरमध्ये दाखल झाले. पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांनी सीपीआर परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांचा संताप पाहून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमर जाधव, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, दयानंद ढोमे, दिनकर मोहिते हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांना पाहून कार्यकर्ते जास्तच संतापले. पोवार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलीस घेऊन जात असताना नातेवाईक व कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. जोपर्यंत वडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजीव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, त्यांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यास परवानगी देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक गोयल यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु ते रात्री उशिरापर्यंत ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. (प्रतिनिधी) तपास सीआयडीकडे : मनोजकुमार शर्माया घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी सहायक पोलीस निरीक्षक संजीव पाटील यांना तत्काळ निलंबित केले. तसेच या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक कांबळे यांच्याकडे दिला. मात्र, नातेवाईक व दलित कार्यकर्त्यांनी खुनाचा गुन्हा (कलम ३०२) जोपर्यंत दाखल होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाइकांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. विशेष शवविच्छेदन मृत पोवार याचे शवविच्छेदन मिरज येथील शासकीय रुग्णालयात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असून, ते शवविच्छेदन सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत तसेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, महसूल विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. कोल्हापुरातील सीपीआरमध्ये अशी विशेष शवविच्छेदनाची सोय नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक गोयल यांनी सांगितले. अंगावर मारहाणीचे वळ जगदीश पोवार याला पोटात व छातीत दुखत असल्याच्या कारणावरून वडगाव पोलिसांनी सीपीआरमध्ये दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. शा. पाटील पंचनामा करण्यासाठी सीपीआरमध्ये आले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता, पाठीवर व हातावर मारहाणीचे वळ दिसून आले. त्यानंतर वरिष्ठांना फोनवरून माहिती देऊन ते निघून गेले. आई-बापापासून पोरका जगदीश पोवार हा पाच महिन्यांचा असताना त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्याच्यासह थोरला भाऊ राजू या दोघांचा सांभाळ आत्या आशा पोवार यांनी केला. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून त्यांनी या दोघांना मोठे केले. जगदीश हा वडगाव येथील आंबेडकर कॉलेजमध्ये कला शाखेच्या तिसऱ्या वर्षांत शिकत होता. त्याचा मृतदेह पाहून आत्याने टाहो फोडत पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली. बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांच्या समोरच मुर्दाबादच्या घोषणा त्या देत होत्या.
पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून तत्काळ निलंबित करण्याची मागणी
By admin | Updated: August 24, 2014 01:27 IST