कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील अर्ज छाननीचा वाद बुधवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोहोचला. छाननीत उमेदवारी अर्जावर हरकत आल्याने आमदार सतेज पाटील गटाचे माजी अध्यक्ष सर्जेराव दिनकर माने (रा. भेंडवडे, ता. हातकणंगले) आणि बाळसाहेब रघुनाथ पाटील (रा. वडणगे, ता. करवीर) यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश जयसिंगराव चिटणीस आणि सचिव उदय मोरे यांच्या विरोधात बुधवारी (दि. ५) शाहूपुरी पोलिस फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
सर्जेराव माने आणि बाळासाहेब पाटील यांनी आमदार सतेज पाटील गटाच्या वतीने छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यावर सत्ताधा-यांच्या वतीने हरकत नोंदवण्यात आली. हरकतीसाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक चिटणीस आणि सचिव मोरे यांनी खोट्या सह्या केलेली चुकीची माहिती पुरवल्याचा आरोप माने आणि पाटील यांनी केला आहे. याबाबत कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस आणि सचिव उदय मोरे यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली.