कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडे कोविड प्रतिबंधात्मक लस भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असली तरीही लाभार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
सोमवारी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात २,०५१ नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली. यामध्ये हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाइन वर्कर ३१ व १८ ते ४५ वर्षांपर्यंत १,६६९ तसेच ४५ ते ६० वर्षांपर्यंत २६१ आणि साठ वर्षांवरील ९० नागरिकांचा समावेश आहे.
आज, मंगळवारी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी पहिल्या डोसच्या लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे. त्यांनी महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडे लसीकरण करण्यासाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.