लोकमत न्यूज नेटवर्क
कदमवाडी : लसीकरणावेळी नागरिकांना त्रास होत असल्याची दखल घेऊन आमदार ऋतुराज पाटील यांनी शनिवारी कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात जाऊन केंद्रावरील नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. पावसाची शक्यता लक्षात घेता रांगेत थांबणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने तातडीने मंडपाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसींबाबत नागरिकांना आदल्या दिवशी योग्य माहिती द्यावी, त्यामुळे लसीकरणासाठी गर्दी होणार नाही, अशा सूचना आमदार पाटील यांनी यावेळी केल्या.
आ. पाटील यांनी लसीकरण नियोजनाबद्दल महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे आणि महापालिका अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन लसीकरण योग्य नियोजनाबाबत चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर सेवा रुग्णालयात जाऊन लसीकरण नियोजनाची माहिती घेतली. लसीकरणासाठी आलेल्या लोकांशी चर्चा केली, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या केंद्रावर लसीकरणाचे चांगले नियोजन केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
आमदार पाटील म्हणाले, शासनाकडून किती लस दिल्या जाणार, कधी देणार, याबद्दल लोकांना आदल्या दिवशी माहिती द्यावी. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही. ज्या लोकांचे लसीकरण होऊन जास्त दिवस झाले आहेत, त्यांना प्राधान्याने लस द्यावी.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.उमेश कदम, सामाजिक कार्यकर्ते बंडू जाधव, प्राचार्य महादेव नरके, संजय लाड, योगेश निकम उपस्थित होते.
१००७२०२१-कोल-ऋतूराज पाटील
कोल्हापुरातील सेवा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर जाऊन आमदार ऋतुराज पाटील यांनी शनिवारी लसीकरणासाठी आलेल्या लोकांच्या अडचणी समजून घेतल्या.