कोल्हापूर : गोविंद पानसरे यांची हत्या हा भाकपच्या विचारधारेवरील हल्ला आहे. अंधश्रद्धा, जातिभेद निर्मूलनासाठी पानसरेंनी आयुष्य वेचले. धर्मनिरपेक्षता, समता या तत्त्वांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. पानसरेंच्या या लढ्याला विरोध करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींनी त्यांची हत्या केली, असा आरोप भाकपचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड शमिम फैजी यांनी केला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या २२व्या त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन रविवारी फैजी यांच्या हस्ते येथील शाहू स्मारक भवनमध्ये झाले. यावेळी ते बोलत होते. गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अधिवेशनास प्रारंभ झाला. ते म्हणाले, पानसरेंच्या निधनामुळे आम्ही दु:खी जरूर झालो आहोत, पण खचणार नाही. विचारांची ही लढाई नव्या प्रेरणेने आणि नव्या निर्धाराने सुरू करण्याचा निर्धार अधिवेशनात करत आहोत. पानसरेंनी जी लढाई लढली, ती कधीच संपणार नाही. पानसरेंच्या या लढ्याला विरोध करणाऱ्या धर्मांध वृत्तीची केंद्रात व राज्यात सत्ता आहे. याच प्रवृत्तींनी पानसरे यांची हत्या केली आहे, असे आमचे ठाम मत आहे. ते म्हणाले, पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ ११ मार्चला पुरोगामी व डाव्या पक्षातील कार्यकर्ते मुंबई येथे महामोर्चा काढणार आहेत. या मोर्चात सुमारे एक लाख लोक सहभागी होतील. माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य उदयन शर्मा म्हणाले, प्रतिगामी शक्ती सांस्कृतिक राष्ट्रवादाचा बनाव रचत आहेत. हा बनाव रोखण्यासाठी आपल्याला केवळ राजकीय आघाडीवर काम करून चालणार नाही, तर सांस्कृतिक लढाईही लढावी लागणार आहे. यावेळी लाल निशाण पक्षाचे सुभाष गुरव, जनता दल (सेक्युलर)चे शिवाजी परुळेकर आदींची भाषणे झाली. भाकपचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो, राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य मनोहर देशकर, राज्य सहसचिव तुकाराम भस्मे, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ सदस्य सुकुमार दामले, नामदेव गावडे, नामदेव चव्हाण, शिवकुमार गणवीर, मनोहर टाकसाळ, तानाजी ठोंबरे, माधुरी क्षीरसागर, आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते दत्ता मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी गत तीन वर्षांत पुरोगामी चळवळीशी संबंधित देश-विदेशांतील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. दुपारच्या सत्रात पक्षाच्या संघटनात्मक व राजकीय कामगिरीच्या अहवालावर चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी) पानसरेंच्या अनुपस्थितीतील पहिले अधिवेशन गोविंद पानसरे यांच्यासारख्या एका लढाऊ योद्ध्याच्या अनुपस्थितीमध्ये पक्षाचे राज्यस्तरीय अविधेवशन कोल्हापुरात सुरू झाले. या अधिवेशनात पानसरेंची उपस्थिती नेहमीच असायची. पक्षाचे एकविसावे अधिवेशन अण्णांच्या मूळ जिल्ह्यात अर्थात अहमदनगरला झाले होते. यावर्षीचे अधिवेशन त्यांच्या कर्मभूमीत-कोल्हापुरात होते; पण काळाने डाव साधल्यामुळे पानसरे या अधिवेशनाच्या विचारमंचावर रविवारी दिसले नाहीत. जणू एक योद्धा गमावल्याची भावनाच सभागृहातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती.
धर्मांध प्रवृत्तीकडूनच पानसरेंची हत्या : फैजी
By admin | Updated: February 23, 2015 00:18 IST