भारत चव्हाण / कोल्हापूर : आपले हेतू साध्य झाले नाहीत अथवा आपले महत्त्व वाढत नाही, असे वाटले की एखादे चांगले काम बंद पाडण्याची एक ‘व्हाईट कॉलर’ प्रवत्ती कोल्हापुरात बळावत चालली असल्याचा संशय पंचगंगा नदीघाट विकासकामातून येत आहे. या कामाला मंजुरी मिळाली होती, निधी होता, कामाला सुरुवात झाली आणि एक दिवस काम थांबले. आता तर काम ‘फाईलबंद’ झाले.
तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील व तत्कालिन आमदार राजेश क्षीरसागर यांनी पंचगंगा नदीघाट येथे पर्यटकांकरिता मुलभूत सोयी-सुविधा करण्याचे काम हाती घेतले. २०१७मध्ये या कामासाठी ४ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर झाला होता. कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम केले जाणार होते. त्याला पुरातत्व विभागाची पार्टली मंजुरी देण्यात आली होती. या कामासाठी ठेकेदार नियुक्त झाले. तत्कालिन पालकमंत्री पाटील व राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत कामाचा प्रारंभही करण्यात आला.
ठेकेदाराने कामाला सुरुवात केली आणि एके दिवशी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने काम थांबविण्याचे आदेश दिले. काही व्यक्तींनी या कामाबाबत केंद्रीय पुरातत्व विभागाकडे हरकत दाखल करुन काम थांबविण्यास भाग पाडले. हरकती केल्या नाहीत तोपर्यंत सगळे व्यवस्थित सुरु होते. नंतर मात्र तक्रारी दाखल केल्या. त्यामुळे पुरातत्वच्या सर्वेअरनी जागेची पाहणी केली. त्यांच्यासमाेर कोल्हापुरातील तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी चुकीचे सादरीकरण करुन ब्रम्हपुरी टेकडी या वारसा स्थळापासून शंभर मीटरच्या आत काम होत असल्याची माहिती दिली आणि काम बंद पडण्यास मोठा हातभार लागला.
पुरातत्व विभागाला चुकीची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी कामात आडकाठी आणली, अशी चर्चा आहे. नंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने पत्र देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला काम थांबविण्याच्या सूचना दिल्या. पर्यटकांच्या दृष्टीने एक चांगले होणारे काम थांबले. काम का थांबले, कोणी तक्रारी केल्या, त्यातील वस्तूस्थिती काय होती, यावर विचारविनिमय होऊन पुन्हा काही त्यातून मार्ग निघतो का, हे पाहिले पाहिजे.
- नदीघाटावर ही कामे होणार होती -
नदीघाटावर एक जुन्या पद्धतीची भिंत, एक कमान, चार दीपमाळा स्तंभ बांधले जाणार होते. पाथवे केला जाणार होता. लॅन्डस्केपिंग, नदी पात्रातील पायऱ्यांची दुरुस्ती, विरंगुळा केंद्र, बैठक व्यवस्था, विजेची व्यवस्था अशी कामे पहिल्या टप्प्यात केली जाणार होती. तर दुसऱ्या टप्प्यात स्मशानभूमीपर्यंत २८ कोटींची कामे प्रस्तावित होती. एक अप्रतिम पर्यटनस्थळ करण्यात येणार होते.
-शिवाजी पुलाचाच अनुभव -
शिवाजी पुलाला पर्यायी नवीन पूल बांधताना अशीच काही मंडळी आडवी पडली होती. पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाल्यानंतर पुरातत्व विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. सात-आठ झाडे तोडण्यास व एक पाण्याचा हौद तोडण्यास विरोध करण्यात आला. विघ्नसंतोषी मंडळींच्या विरोधामुळे पुलाचे बांधकाम रखडले. दरम्यानच्या काळात एका वाहनाला अपघात होऊन त्यात १३ व्यक्तींचा मृत्यू झाला. नवीन पूल वेळेत झाला असता तर हा अपघातही टळला असता. आता अशीच मंडळी नदी घाटाच्या कामात आडवी पडली आहेत.
-ब्रम्हपुरी वारसास्थळ नेमके कोठे?
पुरातत्वच्या सर्वेअरसमोर ब्रम्हपुरी टेकडीबाबत झालेले सादरीकरण चुकीचे होते. त्यांची धूळफेक केली गेली, असा दावा काहीजण करतात. जर सादरीकरण चुकीचे झाले असेल आणि त्यामुळे घाट विकासाचे काम बंद पडले असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यात लक्ष देऊन नेमकी वस्तूस्थिती काय आहे, याची माहिती घेतली पाहिजे. मंत्री, खासदार, आमदार यांनीही यात लक्ष घातले पाहिजे. कोणीतरी खोडसाळपणाने कामे थांबवत असेल तर ते योग्य नाही.