कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील संवेदनशील असलेल्या करवीर तालुक्यातील पाचगाव व गिरगाव या गावांवर पोलीस प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या अंतिम दिवशी आज, सोमवारी या दोन्ही गावांत सन्नाटा जाणवत होता.पाचगाव हे या मतदारसंघातील ‘अतिसंवेदनशील’ गाव म्हणून ओळखले जाते. या गावात ईर्ष्येने मतदान होते. गत विधानसभा निवडणुकीपासून पाचगाव हे, तर गिरगाव हे दोन दिवसांपूर्वी कॉर्नर सभेपूर्वी झालेल्या राड्यावरून पोलिसांच्या ‘हिट लिस्ट’वर आले. पाचगावपासून अगदी दोन-तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या गिरगावमध्ये गावकऱ्यांमध्ये शांतता दिसून येत होती. दरम्यान, गिरगावमधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दबक्या आवाजाने चर्चा...पाचगाव व गिरगावमधील चौका-चौकांत राजकारणावर दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. अक्षरश: निरव शांतता दिसून येत होती. त्याचबरोबर पानटपऱ्यांवर ‘दक्षिण’मध्ये काय होणार ? कोण जिंकणार? अशी दबक्या आवाजात चर्चा होती.पक्षांचे झेंडे, फलक गायब...
या दोन्ही गावांत उमेदवारांचे झेंडे, त्यांचे फलक कोणत्याही चौकात अथवा कोणाच्याही घरांवर दिसून येत नव्हते. त्यामुळे या गावात कोणत्या उमेदवारांची ताकद, जोर समजून येत नव्हता.शेतकरीवर्ग मळणीत मग्न...एकीकडे या मतदारसंघातील दोन्ही गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात तरुण कार्यकर्ते प्रचारात दिसून येत होते, तर दुसरीकडे शेतकरीवर्ग भातमळणीच्या कामात मग्न असल्याचे चित्र होते.गावातील रस्ते ओसदोन दिवसांपूर्वी झालेल्या राड्यावरून गिरगावमध्ये सन्नाटा होता. महिलावर्ग दारात बसून हाता, तर पुरुष शेतीकामात व्यस्त होते. रस्ते ओस पडले होते.