राधानगरी : नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेला राधानगरी तालुका एकप्रकारे ऑक्सिजन पार्क आहे. त्यामुळे कृत्रिम ऑक्सिजन पुरविण्याची गरज कमी प्रमाणात असेल. तरीही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अंदाजामुळे अडचण उद्भवली तर येथील ऑक्सिजन प्रकल्प आधारवड ठरेल, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले. राधानगरी ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प, व्हेंटिलेटर मशीन व रुग्णवाहिका लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश अबिटकर उपस्थित होते.
खासदार मंडलिक म्हणाले, कोरोनावरील उपचारासाठी लोक शासकीय रुग्णालयाला प्राधान्य देत होते. खासगी रुग्णालयापेक्षा येथे आपण लवकर बरे होऊ, असा विश्वास मिळण्याइतपत चांगले काम आरोग्य व अन्य यंत्रणांनी केले. त्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले जाईल. आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, भविष्यातील गरज म्हणून येथील सुविधा तयार केल्या असल्या तरी कोरोनाची तिसरी लाट येऊच नये व या सुविधांचा वापर करावा लागू नये, याची दक्षता सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे.
आमदार आबिटकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला एक कोटी आठ लाख रुपये खर्च आला आहे. त्यातून दररोज मोठे १०० सिलिंडर इतकी ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते. आबिटकर यांच्या स्थानिक विकास निधीतून १६ लाख रुपये खर्चून रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. विविध कंपन्यांच्या माध्यमातून सात लाखांचे दोन व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत. या सर्व सुविधांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी सभापती सोनाली पाटील, ‘गोकुळ’चे संचालक अभिजीत तायशेटे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती वंदना जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला तहसीलदार मीना निंबाळकर, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, जिल्हा सहाय्यक शल्य चिकित्सक विलास देशमुख, सरपंच कविता शेट्टी, उपसभापती वनिता पाटील, मोहन पाटील, नंदकिशोर सूर्यवंशी, अरुण जाधव, उत्तम पाटील, भिकजी हळदकर आदी उपस्थित होते. डॉ. गणेश गवळी यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. राजेंद्र शेट्टे यांनी आभार मानले. शशिकांत बैलकर यांनी सूत्रसंचालन केले.
राधानगरी- येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प, व्हेंटिलेटर मशीन व रुग्णवाहिका लोकार्पण खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले. यावेळी मीना निंबाळकर, वंदना जाधव, आमदार प्रकाश आबिटकर, अभिजीत तायशेटे उपस्थित होते.