सावर्डे : पश्चिम पन्हाळा परिसरात उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे. याचा ऊस उत्पादनावर परिणाम होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
सन २००३ ते २००६ या दरम्यान जिल्हात सर्वत्र उसावर मोठ्या प्रमाणात लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला होता. या माव्याच्या प्रादुर्भावामुळे ऊस उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली होती. पुन्हा चालू वर्षी उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. उसाच्या मागील बाजूस कीड असल्याने औषध फवारणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहे.
पावसाने गेले १५ ते २० दिवस दडी मारली होती. कधी कडकडीत ऊन तर कधी ढगाळ वातावरण या वातावरणामुळे माव्याचा प्रादुर्भाव वाढला असण्याची शक्यता आहे.
शेतकरी आता आडसाली ऊस लागणीतला पाला जनावरांच्यासाठी काढू लागला आहे. यावेळी उसावर माव्याचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. माव्यावर कीटकनाशक औषधांची फवारणी करायची तर जनावरांना पाला काढता येणार नाही. म्हणून शेतकरी पाला काढून औषध फवारणी करण्याच्या तयारीत आहेत. अतिउग्र वासाची कीटकनाशके असल्याने जनावरांना पाला घालण्याचे धोक्याचे ठरू शकते. माव्याच्या प्रादुर्भावामुळे उसाची वाढ खुंटते. त्यामुळे साहजिकच ऊस उत्पादनात प्रचंड घट निर्माण होते. माव्याचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी औषध फवारणी करणे गरजेचे आहे.
फोटो ओळ: सावर्डे (ता. पन्हाळा) येथे ऊस पिकावर अशा प्रकारे लोकरी मावा पडलेला दिसून येत आहे. (छाया -कृष्णात पाटील)