भारत चव्हाणकोल्हापूर : आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधी स्मारकाचा निधी रोखल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसैनिकांनी जनतेसमोर झोळी पसरून निधी संकलन करत राज्य सरकारचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध केला. १५ ऑगस्टपूर्वी स्मारकाचा १० कोटी ४० लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला नाही तर कोल्हापूर बंद करण्याचा तसेच मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर प्रवेश बंद करण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या ईच्छेनुसार येथील नर्सरी बागेत कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत शाहू समाधी स्मारक उभे करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील कामाला महानगरपालिकेने निधी दिला. परंतु दुसऱ्या टप्प्यातील कामास राज्य सरकारच्या समाज कल्याणविभागामार्फत १० कोटी ४० लाखांचा निधी जून महिन्यात मंजूर केला आहे. परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक कामांना ब्रेक लागला आहे. याचा फटका शाहू समाधी स्मारकाच्या कामालाही बसला आहे. मंजूर झालेला निधी वर्ग न झाल्याने शाहूप्रेमीमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आज, शुक्रवारी कोल्हापुरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हातात काळी झोळी घेऊन बिनखांबी गणेश मंदिर येथून निधी संकलन करण्यास सुरवात केली. शाहू स्मारकाचा निधी रोखणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत शिवसैनिक महाद्वार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका चौक, माळकर तिकटी मार्गे छत्रपती शिवाजी चौकापर्यंत निधी संकलन केले. हा संकलित निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्त केला जाणार आहे.
..अन्यथा मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर प्रवेश बंद, शाहू समाधिस्थळाच्या निधीवरुन शिवसेना आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 13:58 IST