कोल्हापूर : त्रिपक्षीय कमिटी स्थापन करून वेतनाचा प्रश्न मार्गी लावा; अन्यथा आगामी गळीत हंगामात एकाही साखर कारखान्याचे धुराडे पेटणार नाही, असा इशारा राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला. साखर कारखानदार व आयुक्तांना जाग आणण्यासाठी ८ आॅगस्टला पुणे येथील आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भोसले म्हणाले, राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढीचा करार मार्च २०१४ मध्ये संपला आहे. याबाबत मुख्यमंत्री, साखर संघाचे अध्यक्ष, सहकारमंत्री, कामगारमंत्री व साखर आयुक्तांना कळविले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही वेतन कमिटी स्थापन करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत. पण, पाच महिने उलटले तरी अद्याप शासनाने कमिटी स्थापन केलेली नाही. यामुळे कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. शासन व साखरसम्राटांना जाग आणण्यासाठी ८ आॅगस्टला सकाळी अकरा वाजता साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही भोसले यांनी सांगितले. अनेक कारखान्यांत दहा-दहा वर्षे रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी आहेत. त्यांना किमान वेतनसुद्धा मिळत नाही. या कामगारांना कायम करण्याचा प्रयत्न आहे. शासन ग्रामसेवक, गटसचिव, शिक्षकांच्या प्रश्नांबाबत तातडीने लक्ष घालून सोडवते; पण साखर कामगारांच्या प्रश्नांबाबत दुर्र्लक्ष करीत आहे. सरकारला जाग आणण्यासाठी राज्यातील ५० हजार साखर कामगार मोर्चात सहभागी होणार असल्याचे शंकरराव भोसले यांनी सांगितले. साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष राऊसो पाटील, चिटणीस रावसाहेब भोसले, विठ्ठलराव परबकर, पंडित चव्हाण, सुभाष गुरव, यशवंत पाटील, तात्या पाटील, संजय मोरबाळे, विलास गुरव, महादेव बच्चे, एम. एस पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अन्यथा धुराडी पेटणार नाहीत
By admin | Updated: August 3, 2014 01:45 IST