कोल्हापूर : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, हे रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पदयात्रेतील लोकांसमोर भाषण करण्यासाठी जात होते. त्यावेळी उपस्थितीत काही जणांकडून त्यांच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करीत ‘जावा, जावा’ असे हातवारे केले. ‘एकच गट्टी, राजू शेट्टी’, अशी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे या तिघांनाही भाषण न करताच परतावे लागले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड जन समुदायाने ठिय्या मारला होता. प्रत्येकामध्ये महादेवी गुजरात वनतारामध्ये नेल्याची प्रचंड चीड जाणवत होती. अशातच हे तिघेही तिथे गर्दीतून वाट काढत गेले. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ माइकच्या दिशेने जात होते. त्याचवेळी जोरदार गोंधळास सुरुवात झाली. जमाव उभा राहून हुर्याे घालू लागला. ‘जावा, जावा’, असे म्हणत हातवारे करू लागला. काही जण या तिघांच्या दिशेने येऊ लागले. परस्थिती स्फोटक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिघांसह भाजप, शिंदेसेेनेच्या पदाधिकारी हे भाषण न करताच निघून गेले.
निवेदन देण्याची संधी महिलांनाभाषण करण्याची संधी मिळाली नाही, तर किमान निवेदन देण्यासाठी तरी जाता येईल, म्हणून काही नेते, पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती; पण निवेदन कोण देणार, याचे आधीच नियोजन केले होते. दहा महिलाही निवेदन देण्यासाठी दाखल झाल्या होत्या. त्यांनी आणि धर्मगुरूंनी निवेदन दिले.
प्रचंड ढकलाढकली..जैन मठाचे भट्टारक स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महाराज गर्दीतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करीत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत येण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली. यातून प्रवेशद्वाराच्या गेटची ढकलाढकली झाली. आतून पोलिस ढकलत होते. बाहेरून लोक ढकलत होते, असा प्रकार काही वेळ चालला होता. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी हजर राहून परस्थिती संयमाने हाताळली.
चौघे जण बेशुद्धनांदणीपासून ४५ किलोमीटरचे अंतर चालत आल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक थकले होते. यामुळेच अति थकव्यामुळे चौघे जण बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले.