कऱ्हाड : कऱ्हाड-पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधकांनी गोंधळ घातला़ गोंधळातच विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाले़ चेअरमन महेंद्र जानुगडे अध्यक्षस्थानी होते़ सभेच्या सुरुवातीला व्यवस्थापक सुभाष पानस्कर यांनी गतवर्षीच्या इतिवृत्ताचे वाचन केले़ त्यानंतर विषय पत्रिकेवरील एक-एक विषय समोर आले़ त्यात २०१३-१४ च्या आर्थिक वर्षात बजेटपेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देण्यावरून सत्ताधारी विरोधकांच्यात ‘तू-तू मै-मै’ सुरू झाले़ त्यावरून घोषणा-प्रतिघोषणा होऊ लागल्या. त्यामुळे दोनवेळा सभेत गोंधळ झाला़ मात्र, अध्यक्ष महेंद्र जानुगडे यांनी सर्वांना शांततेचे आवाहन करून सभा पुढे सुरू केली़ ‘तुम्ही तुमचा प्रत्येक प्रश्न विचारा त्याचे उत्तर आम्ही देऊ़ तसेच विषय पत्रिकेवरील विषयात जर विरोध असेल तर तो विषय मताला टाकू . नामंजूर झाला तर नामंजूर करू,’ असे भावनिक आवाहन अध्यक्ष जानुगडे यांनी केले; पण तरीही पुन्हा गोंधळ झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर मात्र गुरुजींना शिस्त लागली़ ‘मंजूर-मंजूर’ च्या घोषणात वंदे मातरम् कधी सुरूझाले हेही कुणाला कळाले नाही़ आजच्या सभेत १५ कोटींच्या उद्दिष्ट्यपूर्तीनंतर २० कोटी भागभांडवल करण्यास मंजुरी, सभासद कल्याण निधी २०० व १०० करण्यास मंजुरी, शिक्षक सभासद वर्गणी अनुक्रमे १००० व ५०० रुपयांस मंजुरी, प्रासंगिक कर्ज मर्यादा ३० हजारांवरून १ लाख, मध्यम मुदत कर्ज ४ लाख ९० हजारांवरून ६ लाख, विषेश कर्ज ३ लाखांवरून ४ लाख तर सभासद कल्याण निधीच्या व्याजातून निष्कर्जी सभासदास ३० हजारांची होणारी मदत १ लाख करण्याला मंजुरी देण्यात आली़ यावेळी विद्यमान संचालक मंडळास जिल्हा शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष मोहन सातपुते, संचालक अरुण पाटील, शिक्षक समितीचे अंकुश नांगरे, अखिल भारतीय शिक्षक संघाचे गणेश जाधव आदींनी संस्थेच्या कारभाराविषयी प्रश्न विचारले. मात्र गोंधळामुळे संचालक मंडळाला उत्तरे देण्याची तयारी असतानाही ती सभासदांपर्यंत पोहोचू शकली नाहीत़
शिक्षक सोसायटीच्या सभेत विरोधकांचा गोेंधळ
By admin | Updated: August 4, 2014 00:08 IST