मिरज : लोकसभेतील पराभवानंतरही सत्ताधाऱ्यांच्या वर्तणुकीत फरक पडलेला नाही. अशा फसव्या लोकांना घरी बसविण्याची संधी जनतेला येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती देणार असल्याचे प्रतिपादन खा. संजय पाटील यांनी डोंगरवाडी येथे केले. त्यांनी नाव न घेता गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. मिरज तालुक्यातील रखडलेल्या डोंगरवाडी कालव्याच्या प्रलंबित कामास खा. संजय पाटील यांच्या हस्ते, विलासराव जगताप, दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. उदघाटनानंतर खा. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री अजितराव घोरपडे हे आमच्यासोबत आहेत. महायुतीच्या बैठकीतून कवठेमहांकाळच्या जागेचा तिढा सुटेल, असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही सत्ताधाऱ्यांच्या वागण्यात बदल झालेला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत फसव्यांना घरी बसविण्याची संधी जनतेला महायुती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर आवश्यकता असेल तिथे या योजनांचा पाठपुरावा करणार आहे. प्रलंबित डोंगरवाडी कालव्याच्या कामास मंजुरी मिळाली. जत तालुक्यातही पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार येळ्ळूर येथे कर्नाटक पोलिसांनी मराठी जनतेवर अमानुष लाठीहल्ला केला आहे. कर्नाटक पोलिसांच्या या दडपशाहीविरोधात केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार असल्याचे खा. संजय पाटील यांनी सांगितले.
फसव्यांना घरी बसविण्याची जनतेला संधी : पाटील
By admin | Updated: July 28, 2014 23:23 IST