कोल्हापूर : रिझर्व्ह बॅँकेचे धोरण धाब्यावर बसवत केलेल्या कारभारामुळे प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेच्या संचालकांवर कारवाई अटळ आहे. शहर उपनिबंधक व करवीरच्या सहायक निबंधकांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्हा उपनिबंधकांनी कारवाई सुरू केली असून बॅँकेला याबाबतचे म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात येणार असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. बॅँकेने तरलता न राखता २०११-१२ व १२-१३ या आर्थिक वर्षात लाभांश वाटप केलेले आहे. हे करत असताना २०१२-१३ यावर्षी बॅँकेने नफा विभागणी केलेली नाही. बॅँकेने तरलता न राखल्याने सभासदांना लाभांश वाटपास रिझर्व्ह बँकेने मनाई केली होती, तरीही वाटप केल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवला आहे. अशा विविध बाबी चौकशी अहवालात स्पष्ट झालेल्या आहेत. एकरकमी परतफेड योजनेत थकीत कर्जदारांना सवलत दिलेल्या जादा व्याजाची रक्कम संबंधित कर्जदारांकडून वसूल करण्याची जबाबदारी संचालकांची आहे, अशा प्रकारे अहवालात बॅँकेच्या कामकाजाबाबत तीव्र शब्दात शेरे मारले आहेत. दोन्ही चौकशी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार लाभांश वाटप व एकरकमी परतफेड योजना यामध्ये संचालक मंडळ अडकणार हे निश्चित आहे. याबाबतचा जिल्हा उपनिबंधकांनी खुलासा मागितला आहे. येत्या आठ दिवसांत खुलासा घेऊन त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. शिक्षक बँकेबाबतचा अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ठेवलेल्या ठपक्याबाबत बॅँकेकडे खुलासा मागवून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. कायद्यातील तरतुदीनुसार आगामी काळात प्रत्यक्ष कारवाई केली जाईल. - सुनील शिरापूरकर(जिल्हा उपनिबंधक) काय होऊ शकते कारवाईउधळपट्टी केलेल्या रकमेची संचालकांकडून वसुली होऊ शकते.कायद्यातील तरतुदीनुसार थेट संचालक मंडळावरच कारवाई होऊ शकते.
संचालकांवर आता कारवाई अटळ
By admin | Updated: February 7, 2015 00:12 IST