उत्तूर : चिमणे (ता. आजरा) येथे गावापासून सार्वजनिक विहीर व गायरानाकडे जाणारा १०० वर्षांपासून वहिवाट असलेला रस्ता बंद केल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. या रस्त्याची तत्काळ सुनावणी तहसीलदार विकास अहिर यांनी घेऊन वहिवाटीचा रस्ता खुला करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.
गट नंबर १२६मध्ये पाणीटंचाईच्या काळात गायरानाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे सार्वजनिक विहीर काढण्यात आली होती. गेली शंभर वर्ष ही विहीर व रस्ता वापरात होता. जिल्हाधिकारी यांच्या मालकीचे असणाऱ्या गायरानाची देखभाल ग्रामपंचायत जनावरांच्या चाऱ्यासाठी करते.
सध्या गट नंबर ११३मध्ये ०.०२ आर. पोट खराब व ०.०४ आर. रस्ता म्हणून नोंद असताना हा रस्ता राहुल मोरे, सुमन मोरे यांनी बंद केल्याने गायरानकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांची कोंडी झाल्याने तहसीलदारांकडे न्याय मागितला आहे.
या निवेदनावर महादेव आजगेकर, महादेव पाटील, श्रीकांत तारळेकर, कुंडलिक पाटील, धोंडिबा पाटील, सुरेश चव्हाण, विठोबा चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.