कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू खासबाग मैदानाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेतर्फे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नर्सरी बागेतील समाधिस्थळ विकसित करण्याचा ठेका बी. के. पाटील यांना देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती आदिल फरास होते. केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू खासबाग मैदानाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. राज्य शासनाने विशेष निधीतून १० कोटी रुपये याकामी दिले. पार्किंगसह इतर सुविधा पुरविण्यासाठी किमान तीन कोटी रुपयांची गरज आहे. राज्य शासनाकडे निधीची मागणी केली आहे. दरम्यान, महापालिकेच्या निधीतून या सुशोभीकरणाच्या कामासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. शहरातील बगीच्यांमध्ये खेळणी बसविण्याची निविदाही यावेळी मंजूर करण्यात आली. शहरातील जैववैद्यकीय कचऱ्याचा उठाव करून त्याचे निराकरण करण्याचा ठेका ‘नेचर अॅँड नीड’ या कंपनीला देण्यात आला. महापालिकेने २०१३ मध्ये हा ठेका रद्द केला. मात्र, महापालिकेने दिलेल्या जागेला संबंधित कंपनीने मालकी नाव लावले आहे. याबाबत सिटी सर्व्हे कार्यालयास म्हणणे सादर करून फौजदारी दाखल करण्याची मागणी शारंगधर देशमुख यांनी केली. फेअरडील कंपनीने महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या न्यायालयीन कामासाठी विधितज्ज्ञांचे शुल्क अदा करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. राजेंद्रनगर परिसरातील सार्वजनिक वीज बंद आहे. खांबावरील तब्बल ४० दिवे बंद अवस्थेत असून, ते दुरुस्त करण्याची मागणी सदस्यांनी केली.
‘केशवराव‘ला एक कोटी निधी
By admin | Updated: July 22, 2015 00:38 IST