जोतिबा : नवरात्रौत्सवाच्या आज, दुसऱ्या माळेला दख्खनचा राजा जोतिबाची कमळ पुष्प तीन पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधण्यात आली होती. आजची पूजा समस्त मानाचे दहा गावकर यांनी बांधली. मंदिराला गुलाबी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.श्री. जोतिबा देव नवरात्रौत्सवात वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात. आज, मंगळवारी दुसऱ्या माळेनिमित्त कमळ पुष्प तीन पाकळ्यातील महापूजा बांधली. पुजेला आध्यात्मिक व शास्त्राचा आधार आहे. नवरात्रमध्ये कमळ भैरवाने काशीहून सुवर्ण कमळे आणून श्री. जोतिबाची पूजा बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यांचे स्मरण म्हणून आजही रंगीबेरंगी कपडयाच्या कमळ पुष्प पाकळ्या करून ही पूजा बांधली जाते. तीन पाकळ्या या त्रिदेवात्मक अवताराचे प्रतिक आहे. सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला. मंदिरात रात्री भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री १२.३० वाजता त्रिकाळ आरती करून १ वाजता मंदिराचे दरवाजे बंद करण्यात येणार आहेत.
Navratri 2025: दुसऱ्या माळेला जोतिबाची कमळ पुष्प तीन पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:17 IST