इचलकरंजी : येथील बंडगरमाळ येथे घराचा कब्जा घेण्यावरून आणि पूर्ववैमनस्यातून विनयभंग व मारहाण अशा परस्पर विरोधी तक्रारी दिल्या. यामध्ये दोन महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी बाप-लेकावर तर घरात घुसून साहित्याची तोडफोड करून, ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिलेसह पाच जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या घटनेत घरातील साहित्यासह दुचाकी वाहनाची तोडफोड झाल्याने परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बंडगरमाळ परिसरातील पीडित महिला शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नारळ आणण्यासाठी भागातील किराणा दुकानात गेली होती. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या प्रमोद मस्कर याने तिचा हात पकडून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. हा प्रकार महिलेने घरात सांगितल्यानंतर, पीडित महिला व तिची सासू जाब विचारण्यासाठी गेल्या असता, प्रमोद मस्कर व त्याचे वडील सतीश मस्कर यांनी शिवीगाळ करत दोघींचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून प्रमोद व सतीश मस्कर या बापलेकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्षीरसागर व मस्कर कुटुंबात घराचा कब्जावरून वाद आहे. त्याच रागातून शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास संकेत क्षीरसागर, सर्वेश क्षीरसागर व रेखा क्षीरसागर व अन्य दोन अनोळखी अशा पाच जणांनी मस्कर यांच्या घरात घुसून साहित्याची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला, तसेच प्रमोद याला धक्काबुक्की करत दगडाने त्याच्या डोकीत मारहाण करून, जखमी करत ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे प्रमोद याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी सात जणांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.