कोल्हापूर : महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नासाठी महत्त्वाचे विभाग असणारे एलबीटी (स्थानिक संस्था कर) नगररचना, पाणीपुरवठा, घरफाळा या चारही विभागांनी उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली केली आहे. नगररचना विभागाने ३६ कोटी उद्दिष्ट असताना ४८ कोटी १५ लाखांची भर पालिकेच्या तिजोरीत घातली. मनपाच्या उद्दिष्टपूर्तीमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.राज्यभरातील ‘ड’ वर्ग महापालिकेत एलबीटी वसुलीत मोठ्या अडचणी आल्या आहेत. एलबीटी विरोधातील आंदोलनाचे मूळ कोल्हापुरातून सुरू झाले. करपात्र २० हजार व्यापारी असतानाही एलबीटी भरणारे ९ हजारांपेक्षाही कमी आहेत. अशा परिस्थितीत नोटिसा व सुनावणीच्या फेऱ्या घेत महापालिकेने एलबीटीचे ९६ कोटी असणारे उद्दिष्ट १०० कोटी ५५ लाख रुपयांपर्यंत नेण्यात यश मिळविले. चालू आर्थिक वर्षासाठी एलबीटी विभागाने तब्बल ११० कोटींचे उद्दिष्ट घेतले आहे. एलबीटीऐवजी जकात कर असता, तर यावर्षी १५० कोटींपेक्षा अधिक रकमेची वसुली शक्य होती, असे एलबीटी विभागप्रमुख राम काटकर यांनी स्पष्ट केले.३३ टक्के पेड प्रीमियम (वाढीस चटई क्षेत्र योजना) प्रभावीपणे अमलात आणत नगररचना विभागाने उद्दिष्टापेक्षा १२ कोटींची अधिक कमाई केली. ३६ कोटी रुपये असलेले उद्दिष्ट सहज पार करत नगररचना विभागाने ४८ कोटींचा टप्पा सहज ओलांडत मनपाच्या सर्व विभागांत अग्रणी राहण्याचा मान पटकावला आहे. पाणीपुरवठा विभागाने थकबाकीसाठी अनेक योजना राबविल्या. थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई केल्याने ३४ कोटी असलेले उद्दिष्टात बदल करत ४० कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले. आजपर्यंत ३९ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. अद्याप अनेक शासकीय विभाग व सीपीआरकडून दीड कोटी असे एकूण सव्वादोन कोटी रुपयांचे येणे आहे. दोन दिवसांत हे पैसे मनपाच्या खात्यावर जमा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रशांत पंडत यांनी सांगितले.शहरात क रपात्र एक लाख वीस हजार मिळकती आहेत. त्यातून घरफाळा व विविध करांच्या रूपाने मनपाकडे ३२ ते ३४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. यंदाच्या वर्षी घरफाळा विभागास ३६ कोटी ४६ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. अनेक मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकती सील करणे, बेंडबाजासह दारात वसुली करणे, आदींमुळे ३७ कोटी ९१ लाख रुपयांच्या उत्पन्नाची भर मनपाच्या तिजोरीत घातली. (प्रतिनिधी)
महापालिकेची उद्दिष्टपूर्ती
By admin | Updated: April 2, 2015 00:37 IST