कोल्हापूर : चोख सोन्याच्या दागिन्यांसाठी ग्राहक नेहमीच आग्रही असतात, पण हा आग्रह बऱ्याचवेळा चांदीच्या दागिन्यांबाबत नसतो. त्यामुळे फसवणुकीची शक्यता जास्त असते. ग्राहकांना अधिकाधिक चोख चांदीचे दागिने खरेदी करता यावेत, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आता केंद्र सरकारने १ सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवर देखील हॉलमार्किंग लागू केले आहे. त्यामुळे यापुढे चांदीचे दागिने तुम्ही आता डोळे झाकून खरेदी करू शकता.भारतीय जनमानसासाठी विशेषत: महिलांसाठी सोन्या-चांदीचे दागिने म्हणजे आवडती आणि महागडी हौस. वर्षानुवर्षे पैसे साठवत, भिशी भरत महिला वर्षाला गुंजभर तरी सोने खरेदी करतात. भारतीयांचे हे साेने-चांदी प्रेम पाहून त्यांना ते अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण मिळावेत यासाठी शासनाने पूर्वी सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग, त्यानंतर एचयुआयडी नंबर सक्तीचे केले. पण सोन्याबरोबरच चांदीचे दरही झपाट्याने वाढत असल्याने यातही भेसळ होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सरकारने चांदीच्या दागिन्यांवरदेखील एचयुआयडी असलेले हॉलमार्किंगचा नियम केला आहे. १ सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. पण, हा नियम अजून बंधनकारक झालेला नाही.
सात महिन्यांत चांदीची भरारीमहिना - चांदीचा दर (किलो)जानेवारी - १ लाख ७ हजारफेब्रुवारी - १ लाख ८ हजार ६००मार्च - १ लाख १३ हजारएप्रिल - १ लाख २ हजारमे - १ लाख ३ हजार ३००जून - १ लाख १५ हजार ५००जुलै - १ लाख २९ हजारऑगस्ट - १ लाख २१ हजार
फसवणूक टळणार...साेन्याच्या तुलनेत चांदीच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी ग्राहक आग्रही नसतात. त्यामुळे या बाबतीत फसवणुकीची शक्यता अधिक असते. पण आता चांदीच्या दागिन्यांवरदेखील हॉलमार्किंग आणि एचयूआयडी नंबर आल्याने चांदीच्या दागिन्याची सगळी माहिती रेकॉर्डवर येणार आहे. त्यामुळे त्यात चोख चांदी किती, अन्य धातू किती याची माहिती ग्राहकांना कळणार आहे.
देशात चांदीच्या दागिन्यांवर सर्वात पहिले हॉलमार्किंगची पद्धत आपल्या ज्वेलर्सने केली होती. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक टळणार आहे. हा निर्णय सध्या बंधनकारक नसला तरी भविष्यात होऊ शकतो. - भरत ओसवाल, महेंद्र ज्वेलर्स
चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग आल्याने ग्राहकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण दागिने मिळणार आहेत. चांदीच्या गुणवत्तेची खात्री मिळेल. - राजेश राठोड, अध्यक्ष, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ