कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील एका महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती आणि नंतर बाळ दगावण्याच्या घटनेची सार्वजनिक आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाच्या सहा जणांना कारणे दाखवा नोटिसा काढण्यात आल्या असून दोन अधिपरिचारिकांना निलंबित करण्यात आले आहे, तर एका सहायक अधीक्षकाची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली आहे. आपल्याच जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याप्रकरणी तातडीने कारवाईचे आदेश दिले होते.गेल्या आठवड्यात गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील कल्पना आनंदा डुकरे यांची वाटेतच प्रसूती झाली होती आणि बाळ दगावले होते. याबाबत डुकरे कुटुंबीयांसह समाजातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर २१ ऑगस्ट रोजी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन या सर्व घटनेची माहिती घेतली होती.या सर्व भेटीनंतरच्या चौकशी अहवालानुसार कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य प्रशासनाने घेतला आहे. गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज दाते, वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमित पाटील, डॉ. रुपाली चिंचणीकर, औषध निर्माता के. टी. सडोलीकर, प्रयोगशाळा अधिकारी व सहायक चिमाजी आपटे, अभिजीत पाटील, कनिष्ठ लिपिक सागर कांबळे हे या भेटीदरम्यान व रुग्णालयात वारंवार गैरहजर राहत असल्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटिसा काढण्यात आल्या आहेत.अधिपरिचारिका करिश्मा हावळ आणि सुषमा सूर्यवंशी या दोघी संबंधित महिलेला सीपीआरला नेत असताना मधूनच घरी गेल्या. या दोघींनाही निलंबित करण्यात आले आहे, तर जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गवरून प्रतिनियुक्तीवर आलेले सहायक अधीक्षक अंबादास बुलबुले यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना परत सिंधुदुर्गला पाठवण्यात आले आहे.
डॉक्टर गैरहजर, साहित्य अस्ताव्यस्तजिल्ह्याच्या तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जेव्हा गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली तेव्हा त्यांना धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. यावेळी डॉक्टर गैरहजर होतेच शिवाय रुग्णालयातील साहित्यही अस्ताव्यस्त पडलेले होते. औषध भांडारातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. एकूणच दुर्गम असणाऱ्या परिसरात ‘आम्हाला कोण विचारणार’ असाच कारभार सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
बाराही तालुक्यांत सक्त तपासणी आवश्यककेवळ ग्रामीण रुग्णालयच नव्हे तर अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात नसतात अशा तक्रारी आहेत. दोन दोन डॉक्टर्स देण्यात आले असूनही दोघेही गैरहजर असे प्रकार अनेकदा आढळतात. त्यामुळे केवळ एका घटनेने तपासणी करून चालणार नाही, तर नियमित तपासणीमुळेच अशा प्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे.
आरोग्यमंत्र्यांच्या आदेशानुसार या ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली आणि जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल देण्याच्या सूचना दिल्या होत्या. हा अहवाल आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही सर्वसामान्यांच्या आरोग्याबाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. - डॉ. दिलीप माने, आरोग्य उपसंचालक, कोल्हापूर