कोल्हापूर : रेशनवर धान्य कमी देणाऱ्या साने गुरुजी वसाहत येथील ‘त्या’ दुकानदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचे उत्तर आज, बुधवारपर्यंत अपेक्षित आहे. ते आल्यानंतर परवाना रद्द करायचा की निलंबित करायचा याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी मंगळवारी दिली.
कवितके म्हणाले, संबंधित रेशन दुकानदारासंदर्भातील अहवाल शहर पुरवठा अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाला आहे. त्यानंतर प्रक्रियेचा भाग म्हणून त्या दुकानदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार त्याने २४ तासांत उत्तर द्यायचे आहे. सकृतदर्शनी संबंधित दुकानदाराच्या कामात दोष दिसत आहे. तरीही त्याच्याकडून काय उत्तर येते, हे पाहून त्याचा परवाना निलंबित करायचा की रद्द करायचा, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
जिल्ह्यात जर कोणी रेशन दुकानदार काळ्या बाजाराने किंवा जादा दराने धान्य विकत असतील तर त्या संदर्भात ग्राहकांनी त्याची तत्काळ पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार द्यावी. तसेच अंत्योदय व प्राधान्य कार्डवरील आॅनलाईन नोंद असणाºया व्यक्तिसंख्येपेक्षा कमी सदस्यांचे धान्य वितरण करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित दुकानदारावर तत्काळ कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी कवितके यांनी दिला.रेशनवरील ९२ टक्के धान्य वाटप पूर्णरेशनवर गहू व तांदूळ यांचे पाच लाख १२ हजार ४४० इतक्या रेशन कार्डधारकांना वाटप झाले असून, हे प्रमाण ९२ टक्के आहे. या कार्डधारकांना मोफत तांदूळही दिला जात आहे. त्याचे आतापर्यंत दोन लाख ४५ हजार ८० कार्डधारकांना वितरण केले असून, ते प्रमाण ४४ टक्के आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी सांगितले.